Nanded | मुंबईत मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष, नांदेडमधल्या हदगावात कडकडीत बंद

| Updated on: Aug 18, 2022 | 1:07 PM

हदगांव तालुक्यातील आजच्या बंदला अभूतपूर्व असा 100 टक्के प्रतिसाद मिळालाय, अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्याच व्यापाऱ्यानी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली.

Nanded | मुंबईत मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष, नांदेडमधल्या हदगावात कडकडीत बंद
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगांव तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. हदगावसह तामसा-निवघा या महत्वाच्या बाजारपेठांमध्ये बंद पाळण्यात आला. या बंदमुळे आज रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. दत्ता पाटील नावाचे कार्यकर्ते मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानात (Azad Maidan) उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला आता आठ दिवस उलटले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चाललीय, असा आरोप आंदोलकांनी केला. या उपोषणकर्त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी हदगाव तालुक्यातील मराठा समाजाने आज बंदची हाक दिली. या बंदमध्ये सगळेच व्यापारी स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेत.

मराठा समाजाच्या अपेक्षा काय?

राज्यात शिंदे-फडवणीस सरकार अस्तित्वात आल्याने मराठा समाजाला आरक्षण आणि इतर सवलतीचा लाभ मिळेल अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे. त्याच भावनेतून मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आंदोलनांच्या तयारीत आहे. विशेषत: मराठवाड्यात सर्वाधिक संख्येने असणारा मराठा समाज हा शासकीय सेवासुविधा पासून कोसो दूर आहे. आणि यातील गरीब मराठा समाजाचे सगळे अस्तित्व हे शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मात्र बदलत्या निसर्ग चक्रात शेतीचे उत्पन्न साथ देत नाहीये. त्यामुळे सरकारने आता तरी मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी हदगांव तालुक्यातील दत्ता पाटील हडसणीकर हे मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषण करत आहेत. मात्र त्यांच्या उपोषणाला आता नऊ दिवस होत आले तरी त्यांच्या उपोषणाची अद्याप कुणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या उपोषणाकडे आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज हदगाव तालुक्यात बंद पुकारण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

मुंबईत उपोषणाला बसलेले कार्यकर्ते

बंदला 100 टक्के प्रतिसाद

हदगांव तालुक्यातील आजच्या बंदला अभूतपूर्व असा 100 टक्के प्रतिसाद मिळालाय, अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्याच व्यापाऱ्यानी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली. हदगांव शहरासोबतच निवघा तामसा या प्रमुख बाजारपेठेत देखील आज शुकशुकाट होता. विशेष म्हणजे दुकाने बंद करण्यासाठी कुणालाही रैली वगैरे काढून आवाहन करण्याची गरज पडली नाही. सकल मराठा समाजाच्या नुसत्या आवाहनाला प्रतिसाद देत आज बंद पाळण्यात आलाय.