पण बाई, बापासारखं शरीर कुठून आणणार? आमदार संजय गायकवाड घसरले
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. महाले यांनी 'बाप तो बाप रहेगा' असे म्हटल्यावर गायकवाड म्हणाले, " एखाद्या बाईने बाप म्हटल्यास बापासारखं शरीर कुठून आणणार?" अशी टिप्पणी गायकवाड यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा : आमदार श्वेता महाले यांनी एका रॅलीत धनुष्यबाण ताणून दाखवला होता. यावेळी महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेकाही धरला होता. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली आहे. ही टीका करताना गायकवाड यांची जीभ घसरलीय. बाप तो बाप रहेगा हे एखाद्या माणसानं म्हटलं तर बरं आहे. पण एखाद्या बाईने मी बाप आहे म्हटलं तर बापासारखं शरीर कुटून आणणार? हे शोभते का बोलायला, असं म्हणत राजकारणात बाप कोण आहे हे योग्यवेळी दाखवून देऊ, असा इशाराच संजय गायकवाड यांनी दिला आहे.
बुलढाण्यात मीडियाशी संवाद साधताना संजय गायकवाड यांनी हा सवाल केला आहे. यावेळी त्यांनी श्वेता महाले यांच्या आव्हानावरही प्रतिक्रिया दिली आहे. त्या एक महिला आमदार आहेत. माझी बहीण आहे. ताई आहे. त्या मला समोर येऊन बोला म्हटल्या. बँकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र होतो. एका ताटात, एका चमचाने आम्ही जेवण केलं. त्यामुळे समोर येण्याचा काही प्रश्नच नाही. वाढदिवसाला स्पर्धा करणं हा काही विषय नव्हता. त्यांनी बुलढाण्यात भाजपची ताकद वाढवावी. आम्ही चिखलीत शिवसेनेची ताकद वाढवू. विरोध कशाला? असा सवाल करतानाच फक्त इकडची भाजपा काँग्रेसच्या दावणीला बांधल्या जाणार नाही याची काळजी घ्या, असा टोला संजय गायकवाड यांनी महाले यांना लगावला.
महायुती एक संघ
यावेळी त्यांनी महायुती एकसंघ असल्याचा दावा केला. फक्त बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाणा झालाय. ज्यांना कुत्रे हुंगत नाही, ते नाचायला लागले आहेत, असं गायकवाड म्हणाले.
हरामाचा पैसा नाही
महालेंच्या र्रलीवेळी लाईट गेली होती. त्यावरून गायकवाड यांच्यावर टीका झाली होती. गायकवाड यांनी त्यावर खुलासा केला आहे. संजय गायकवाडच्या रॅली लोकांनी पाहिलेल्या आहेत. मी कशाला घाबरू? आमच्याही कार्यक्रमाता लाईट जाते. मी कर्नाटकला होतो. माझा काही संबंध नाही. मी वाढदिवसाच्या रॅलीला प्रतिउत्तर देत नाही. माझ्याकडे हरामाचा पैसा नाही. मी पैशाची अशी उधळपट्टी करणार नाही. वाढदिवस साजरे करताना आम्हाला काही माणसे भाड्याने आणावे लागत नाही. या या माझा वाढदिवस आहे, मला शुभेचा द्या, असं ओढून ताणून म्हणावे लागत नाही. अधिकाऱ्यांना, पोलिसांना कामाला लावा, असा कधी वाढदिवस असतो का? या रे या, आम्हाला शुभेचा द्या, असं होत नसतं. शुभेचा मनातून देत असतात, असा चिमटाही त्यांनी काढला.
विकास की कचरा? सर्वांना माहीत
बुलढाण्याचा कचरा चिखलीपर्यंता आला, अशी टीका महाले यांनी केली होती. त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. बुलढाण्याचा विकासाचा सुगंध महाराष्ट्रात दरवळतोय. काही बोलण्यात अर्थ नाही, जनतेला माहिती आहे की शहरात विकास आहे की कचरा, असा टोला त्यांनी लगावला.
