Weather Alert: औरंगाबाद शहरावरचं धुळीचं मळभ निवळलं, आजपासून वातावरण स्वच्छ, काय सांगतात तज्ज्ञ?

25 आणि 26 जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather Alert: औरंगाबाद शहरावरचं धुळीचं मळभ निवळलं, आजपासून वातावरण स्वच्छ, काय सांगतात तज्ज्ञ?
महाराष्ट्रासह इतर राज्यांत स्वच्छ हवामान असल्याची स्थिती उपग्रहांद्वारे प्रसारीत छायाचित्रात दिसतेय.
| Updated on: Jan 25, 2022 | 7:00 AM

औरंगाबादः मागील दोन दिवसांपासून शहरावर धुलीकणांची चादर अंथरल्याचे चित्र होते. मात्र सोमवारी संध्याकाळपर्यंत या धुळीच्या वादळाची तीव्रता कमी झाली आहे. तसेच आजपासून म्हणजेच मंगळवारपासून औरंगाबादमधील वातावरण स्वच्छ असेल. रविवारपासून सूर्यदर्शन न झालेल्या आणि गारठलेल्या औरंगाबादकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. भारताच्या पूर्वेकडून आलेल्या धुळीच्या वादळामुळे हे चित्र पहायला मिळाले होते. सुरुवातीला हे धुके असल्याचा समज सर्वसामान्यांचा झाला होता. मात्र हे अगदी सामान्य धुळीचे वादळ असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

काय आहे हवामानाचा अंदाज?

शहरातील एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानहून निघालेले धुळीचे वादळ गुजरातमार्गे महाराष्ट्रात दाखल झाले होते. हे अगदी किरकोळ स्वरुपाचे वादळ होते. यामुळे रविवार आणि सोमवारी सकाळपर्यंत शहरावर धुलीकणांची चादर अंथरल्याचे चित्र दिसून आले. या धुळीमुळे दिवसभर सूर्यही झाकोळलेल्या अवस्थेतच होता. तसेच हवेत कमालीचा गारवाही निर्माण झाला होता. सोमवारी औरंगाबादमधील किमान तापमान 11 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 23 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले.

पाकिस्तानातून आलेल्या वादळाने दृश्यमानतेवर परिणाम

पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे रविवारी महाराष्ट्रात पोहोचले. त्यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृश्यमानता कमी झाली होती. मुंबईतील धुलीकणांमध्येही प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. रविवारी हे वादळ अरबी समुद्रात पोहोचले. त्यानंतर ते पुणे, मुंबई आणि उत्तर कोकणात धडकले. यामुळे दृश्यमानता कमी होऊन तापमानातही घट झाली. आता मात्र महाराष्ट्रातील वातावरण स्वच्छ झाले आहे.

धुळीची वादळं कधी तयार होतात?

वाळवंटी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले तर ही धूळ वाऱ्यात मिसळते. या धुळीचे रुपांतर वादळात होते. पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यांमध्ये समावेश झाल्यानंतर धूळ हजारो किलोमीटर प्रवास करते. अशी वादळे ही देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये येतात. महाराष्ट्रात मात्र धुळीच्या वादळांचे प्रमाण कमी आहे. पण अशा वादळांमुळे श्वसनाचे विकार वाढण्याची भीती असते.

राज्यभरासाठी काय इशारा?

पुढील 5 दिवसात उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात 3-5अंश ने हळू हळू घट होण्याची शक्यता आहे. तसेच 25 आणि 26 जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

इतर बातम्या-

निवडणुकीतील अपयशामुळे उद्धव ठाकरे यांचा थयथयाट, फडणवीसांनंतर चंद्रकांत पाटलांचाही पलटवार

चंद्रशेखर बावनकुळे कोरोना पॉझिटिव्ह! पटोलेंविरोधातील आंदोलनात 2 वेळा सहभागी, पोलिसांनीही घेतलं होतं ताब्यात!