Weather Alert: बीड, औरंगाबादमध्ये पावसामुळे हाहा:कार; नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढील 24 तास महत्त्वाचे

| Updated on: Sep 28, 2021 | 8:23 AM

Heavy Rain in Maharashtra | बीड, अकोला, औरंगाबाद याठिकाणी पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. तर नाशिक जिल्ह्याला मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Weather Alert: बीड, औरंगाबादमध्ये पावसामुळे हाहा:कार; नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढील 24 तास महत्त्वाचे
संग्रहित छायाचित्र
Follow us on

मुंबई: गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. बीड, अकोला, औरंगाबाद याठिकाणी पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. तर नाशिक जिल्ह्याला मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यादृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

गंगापूर धरण 100 टक्के भरले

नाशिकमधील गंगापूर धरण 100 टक्के भरले आहे. येत्या 1 ऑक्टोबरला गंगापूर धरणावर जलपूजन सोहळा पार पडेल. महापौर सतीश कुलकर्णी धरणावर जाऊन जलपूजन करतील. सुरुवातीच्या काळात नाशिकमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या आणि आरक्षित पाण्याचा वर्षभराचा प्रश्न मिटला आहे.

बीडमध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान

बीड जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: हाहा:कार उडाला आहे. केज तालुक्यातील अनेक गावातील पिके वाहून गेली आहेत. केज, माजलगाव, गेवराई तालुक्याला पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे समजते. माजलगाव तालुक्यातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. उमरी येथील सरस्वती नदीला पूर आल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

मांजरा धरणाचे 18 दरवाजे प्रथमच उघडले

मुसळधार पावसामुळे केज येथील मांजरा 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व दरवाजे उघडण्याची वेळ ओढावली. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये पावसामुळे उडाली दैना

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. बानोटी, वरठाण, घोसला परिसराला पावसाने प्रचंड झोडपले आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. बानोटी परिसरात नदीचे पाणी गावातील रस्त्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. सोमवारी रात्रीपासून या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे.

अकोला आणि नांदेडमध्येही मुसळधार पाऊस

अकोला जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून याठिकाणी पाऊस कोसळत आहे. तर नांदेड जिल्ह्यातही साधारण अशीच परिस्थिती आहे. रात्रीपासून नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून नांदेड शहर जलमय झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे बुलडाण्याचा संपर्क तुटला

बुलडाणा जिल्ह्यातील रात्रीपासून पावसाचा प्रचंड जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे येळगाव धरणाचे दरवाजे उघडावे लागले. परिणामी पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने बुलडाणा – चिखली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पेठच्या पुलावरून ही पाणी वाहत असल्याने चिखली-खामगाव रस्ताही बंद झाला आहे.

जळगावात दोघांचा वीज कोसळून मृत्यू

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असतानाच वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथे मुरखीबाई वागणे 24 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर विटनेर येथे अचानक घरावर वीज पडल्याने सोनाली बारेला या मुलीचा मुत्यृ झाला आहे. याशिवाय, रावेर तालुक्यात वीज पडल्याने तीन लहान मुले भाजल्याची घटना घडली आहे.

हिंगोलीत पहाटेपासून मुसळधार पाऊस

हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी या भागातील नद्यांना पूर आला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert: पुण्यात घाटमाथ्याच्या परिसरात रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज

(Heavy Rain in several parts of Mahrashtra)