Ayush Komkar murder : पोलीसही हादरले, बंडू आंदेकरचं आणखी एक मोठं कांड समोर, गुन्हा दाखल

मोठी बातमी समोर येत आहे, बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवर आणखी एका प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्य़ात आला आहे, आयुष कोमकर हत्याप्रकरणात सध्या बंडू आंदेकर हा न्यायालयीन कोठडीत आहे.

Ayush Komkar murder : पोलीसही हादरले, बंडू आंदेकरचं आणखी एक मोठं कांड समोर, गुन्हा दाखल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2025 | 7:10 PM

मोठी बातमी समोर येत आहे. आंदेकर टोळीच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या आठ वर्षांपासून ही खंडणी उकळली जात होती, आतापर्यंत जवळपास 5.4 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचं समोर आलं आहे. पैसे दिले नाही तर जीवे मारू अशी धमकी देखील या व्यावसायिकाला देण्यात आली होती. व्यवसायासाठी “प्रोटेक्शन मनी” च्या नावाखाली आंदेकर टोळीने या व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. दरम्यान या प्रकरणात आता   सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि मनोज वार्डेकर याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार 2017  पासून सुरू होता. पुणे शहरात व्यवसाय करत असलेल्या एका व्यावसायिकाकडून  आंदेकरने वेळोवेळी “प्रोटेक्शन मनी” च्या नावाखाली खंडणी उकळली आहे. आरोपींनी फिर्यादी कडून 5.4 कोटी रुपयांची खंडणी उकळली, तसेच व्यवसाय सुरू रहावा म्हणून आणखी 1.8 कोटी रुपयांची मागणी केली होती. गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेल्या या खंडणीच्या प्रकरणाला वैतागून या प्रकरणातील व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या आधी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील सदस्यांवर आयुष कोमकर खून प्रकरणी गुन्हा दाखल आहे, तसेच नाना पेठेत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बंडू आंदेकर हा  आयुष कोमकर खून प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे.

आयुष कोमकर याची हत्या 

गणपती विर्सजनाच्या पूर्वसंध्येला हत्येच्या घटनेनं पुणे हादरलं होतं. आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, आयुष कोमकर याच्या हत्येचा आरोप हा बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीवर आहे. विशेष म्हणजे आयुष कोमकर हा बंडू आंदेकर याचा नातू त्याच्या मुलीचा मुलगा आहे, मात्र आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुषची हत्या घडवून आणल्याचं बोललं जात आहे.