
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरसह राज्यात महाएल्गार आंदोलन सुरु आहे. यामुळे अनेक महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यासोबतच आता आंदोलकांनी आक्रमक पावित्रा घेत रेल्वे रोको केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने पहिल्या दिवसापासून या प्रश्नावर सकारात्मक भूमिका ठेवली असून, आंदोलकांनी लोकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सरकारने पहिल्या दिवसापासून याबाबत सकारात्मक भूमिका ठेवली आहे. आंदोलनच्या आधीही आम्ही बैठक बोलवली होती. आपण चर्चा करुन यातील ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करु, असे आम्ही सांगितलं होतं. पहिल्यांदा बच्चू कडूंनी याला मान्यता दिली होती. त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्रीत मला संदेश पाठवला की लोक जमा होतील, आम्ही असणार नाही. यामुळे अडचण होऊ शकते. त्यामुळे आम्ही बैठकीला येऊ शकत नाही. मग आम्ही ती बैठक रद्द केली, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आजही बावनकुळेंनी त्यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत, त्यांचे हे प्रश्न आंदोलनच्या माध्यमातून सोडवता येतील अशी स्थिती नाही. यावर चर्चा करुन त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल. त्यामुळे त्यांना चर्चेचे आमंत्रण दिलं आहे. काल अनेक लोकांना त्रास झाला आहे, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
त्यामुळे माझं आवाहन आहे की त्यांनी चर्चा करावी. लोकांना त्रास होईल अशाप्रकारे गोष्टी करु नये. अशाप्रकारच्या आंदोलनात काही लोकही शिरतात आणि ते हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सावध राहण्याची आवश्यक आहे. तसेच रेल रॉको वैगरे हे करणं योग्य नाही. ते करण्यास परवानगीही नाही. त्यामुळे आमचं स्पष्ट आवाहन आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक आहोत. याच सरकराने ३२ हजार कोटींचं पॅकेज दिलं. त्यामुळे सर्व प्रकारच्या चर्चेची तयारी आहे. त्यामुळे चर्चा करावी आणि मार्ग काढावा, असेही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.