धक्कादायक! कुत्र्याला घाबरून जोरात पळाला, 18 वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू
एक भटका कुत्रा हर्षल शिंदे आणि त्याच्या मित्राच्या मागे लागला. त्यावेळी हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. मात्र पळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

Badlapur News : रस्त्यावरील भटके कुत्रे सर्वांसाठीच डोकेदुखीचं कारण बनलेले आहेत. अशा कुत्र्यांनी अनेक लोकांचा चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा कुत्र्यांवर नियंत्रण मिळवावे, त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नेहमीच केली जाते. एकीकडे हा प्रश्न कायम असताना दुसरीकडे बदलापुरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. भटक्या कुत्र्यापासून बचाव करून पळणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडे बदलापूर नगरपालिका भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे ही दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली.
हर्षल शिंदे असं तरुणाचं नाव असून तो आपल्या मित्रांसोबत बदलापूर पश्चिमेच्या शनिनगर परिसरात मित्रांना सोडण्यासाठी गेला होता. यावेळी तिथलाच एक भटका कुत्रा हर्षल शिंदे आणि त्याच्या मित्राच्या मागे लागला. त्यावेळी हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. मात्र पळताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.. या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
कुत्र्याला घाबरून मुलगा जोळात पळाला
हर्षलवर 3 वर्षांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. कुत्र्याला घाबरून खूप जोरात पळाल्यामुळे हृदयावर ताण येऊन त्याला अटॅक आला, अशी माहिती बदलापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली. मात्र या संतापजनक घटनेने बदलापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पालिका प्रशासनानंही याची दखल घेत लवकरात लवकरत भटक्या कुत्र्यांच्या समस्येतून बदलापूरकरांची सुटका करू असं आश्वासन नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दिलं.
बदलापुरात एकूण 15 हजारेपक्षा जास्त कुत्रे
बदलापूर शहरात आज घडीला 15 हजार कुत्रे असल्याची माहिती समोर आली. कुत्र्यांच्या हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडतायत. पालिकेनं डॉग शेल्टरच्या माध्यमातून उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी ही समस्या एका दिवसात सुटणं शक्य नाही. यासाठी व्यापक मोहीम हाती घेऊन हा प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. मात्र तोपर्यंत किती जणांना अशा घटनांना सामोरे जावे लागते असाच प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतोय.