दोन मंत्र्यांना दोन विधाने भोवणार? अक्षय शिंदेच्या वकिलाकडून नोटीस, नोटिशीत काय म्हटलंय?

याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय शिंदेंसह पाच पोलिसांना अक्षय शिंदेच्या मृत्यूला जबाबदार धरण्यात आले आहे. त्यातच आता अक्षय शिंदेंच्या वकिलांकडून दोन मंत्र्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

दोन मंत्र्यांना दोन विधाने भोवणार? अक्षय शिंदेच्या वकिलाकडून नोटीस, नोटिशीत काय म्हटलंय?
akshay shinde lawyer Amit Katarnavare
| Updated on: Jan 29, 2025 | 10:10 PM

Akshay Shinde Encounter Case : बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला होता. हा एन्काऊंटर फेक असल्याचे एका अहवालातून सिद्ध झाले होते. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालानंतर राज्य सरकार तसेच गृहमंत्र्यांवर टीका होत आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय शिंदेंसह पाच पोलिसांना अक्षय शिंदेच्या मृत्यूला जबाबदार धरण्यात आले आहे. त्यातच आता अक्षय शिंदेंच्या वकिलांकडून दोन मंत्र्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

अक्षय शिंदे प्रकरणी अक्षय शिंदे यांचे वकील अमित कटारनवरे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस बजावली आहे. या दोन्ही नेत्यांनी अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर प्रसारमाध्यामांशी बोलताना अजब वक्तव्य केली होती. या वक्तव्यावरुन त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

अक्षय शिंदेंच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 5 पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे. याप्रकरणावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेलं असतानाच गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. पोलिसांवर अक्षय शिंदेने फायरिंग केली, त्यामुळे त्यांना जबाबात फायरिंग करावी लागली. अतिशय घृणास्पद कृत्य या व्यक्तीने केलं. डिफेंसमध्ये जर पोलिसांनी असं कृत्य केलं असेल तर यात गैर आहे असं वाटत नाही. एन्काउंटर झालं तेव्हा पाऊस पडत होता. त्यामुळे गन पावडर सापडली नसावी. या गोष्टीसाठी वेळ मिळाला नसेल, असे योगेश कदम म्हणाले होते. तर संजय शिरसाट अक्षय शिंदेला नराधम म्हटले होते. “अक्षय शिंदे हा नराधम होता आणि तो मेला हा जनतेला आवडलेला भाग होता” असे संजय शिरसाट म्हणाले होते.

गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचे कारण देत नोटीस

या दोन्हीही मंत्र्‍यांच्या विधानानंतर आता त्यांना कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. शिवसेनेच्या या दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचे कारण देत नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या दोघांनी न्यायालयाचा निर्णय लागण्याआधीच सुरू असलेल्या खटल्यावर प्रभाव टाकणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळेही या दोघांना नोटीस बजावण्यात आली आहे