फिक्स खासदार, भावी खासदार, जालन्यात अर्जुन खोतकरांसाठी बॅनरबाजी, 2024 मध्ये दानवेंना आव्हान देण्याची तयारी?

| Updated on: Jan 03, 2022 | 2:43 PM

शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्ह आहेत. अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात भावी खासदार असे बॅनर्स लागले आहेत.

फिक्स खासदार, भावी खासदार, जालन्यात अर्जुन खोतकरांसाठी बॅनरबाजी,  2024 मध्ये दानवेंना आव्हान देण्याची तयारी?
जालन्यात खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी
Follow us on

जालनाः शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यात भावी खासदार अशी टॅगलाईन असलेले बॅनर शहरभर झळकवले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाईवरून अर्जुन खोतकर चर्चेत आले होते. रावसाहेब दानवे यांच्यामुळेच ईडीचा ससेमिरा आपल्यामागे लागल्याचा आरोप खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमांमधून केला होता. तसंच आपण जालना लोकसभा लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या याच प्रतिक्रियेनंतर सध्या जालना शहरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावी खासदार’चे अनेक बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर यांच्यातला संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो, अशा राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

दानवे Vs खोतकर वाद उफाळणार!

शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष जुनाच आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीने छापा मारला. या छाप्यामागे रावसाहेब दानवे असल्याचा आरोप खोतकर यांनी केला होता. त्यानंतर जाहीर कार्यक्रमांमध्ये दोघांचेही परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता शहरात अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर भावी खासदार, फिक्स, खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दानवेंविरुद्ध खोतकर यांनी दंड थोपटले होते. मात्र निवडणुकीत भाजप शिवसेना युती असल्यामुळे खूप मनधरणी केल्यानंतर खोतकर यांनी माघार घेतली होती. मात्र आता ईडीच्या कारवाईनंतर दानवेंविरुद्ध ते जाहीर कार्यक्रमांतून आरोप करत आहेत. त्यामुळे आगामी 2024 च्या निवडणुकीत अर्जुन खोतकर विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत पहायला मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खोतकरांवर काँग्रेसच्या गोरंट्याल यांचीही टीका

खोतकर यांच्यासाठी करण्यात आलेल्या या बॅनरवर काँग्रेस नेत्यांनीही काल प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांचं नाव घेता एका कार्यक्रमात यावर खोचक टीका केली. ते म्हणाले, खासदारकीचं स्वप्न पाहणं चांगलं नसतं. पण भावी खासदार म्हणलं नाही तर कार्यकर्तेही पळून जातील, त्यामुळे असं बोलावं लागतं… अशी खोचक टीकाही गोरंट्याल यांनी केली.

इतर बातम्या-

लॉकडाऊन लागणार काय?; राज्याला किती लसींची गरज, मास्क कोणता वापरावा?; वाचा तुमच्या मनातील प्रश्नांना राजेश टोपेंचे उत्तर

Property tax| आमचाही मालमत्ता कर रद्द करा; राज्यभरातील प्रमुख शहरांतून मुख्यमंत्र्यांकडे मागणी, सरकार काय करणार?