
बीडः राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत असून काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसानं बॅकलॉक भरून काढलेला नाही. बीड जिल्ह्यातही सरसरीपेक्षा कमीच पाऊस झालाय. मात्र एवढ्याच पावसाने नागरिकांचे (Beed citizens) हाल सुरु आहेत. बीड शहरातील बसस्थानकाची स्थितीदेखील एवढ्याशा पावसाने उघडी पडली आहे. मध्यवर्ती बस स्थानकाभोवतीच्या (Beed bus stant) रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचले आहे. स्थानकाभोवतीच्या चारही बाजूंनी अशाच प्रकारे खड्डे दिसून येतात. त्यामुळे शहरातील नागरिकांना बसपर्यंत पोहोचायचं असेल तर गावाला जाण्यासाठीच्या बॅगा घेत खड्डे ओलांडत जावे लागत आहे.
बीडच्या मध्यवर्ती बस स्थानकाला खड्ड्यांचा वेढा पडलाय. बस स्थानकाच्या कुठल्याही बाजूला गेलं तरी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. तर या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी बस चालकांसह पायी चालणाऱ्या प्रवाशांना यातून वाट शोधण्याकरिता कसरत करावी लागतेय. दरम्यान तात्काळ हे खड्डे दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शहरातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं. शहरात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलं असून विविध समस्यांकडे लक्ष वेधम्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शनिवारी मोंढा भागातील खड्ड्यात बसून पालिकेच्या कारभाराविरोधात आंदोलन केलं. शहरात डास निर्मूलनाची फवारणीसुद्धा ठराविक वॉर्डातच केली जाते. नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे कायम डोळेझाक केली जाते, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सायंकाळपासून बीड जिल्ह्यात पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली आहे. मागील आठवडाभरात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. मात्र हा पाऊस भीज पाऊस असल्याने जिल्ह्याला आजही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या पावसाने पिकांना जीवदान मिळालं असल तरी पाणी प्रकल्पात म्हणावा तसा पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. रविवारी सायंकाळ पासून पुन्हा पावसाला सुरवात झालीय. तर वातावरणात बदल झाल्याने बीड मध्ये धुकं पाहायला मिळाले त्यामुळे महाबळेश्वरचा अनुभव पाहायला मिळाला. ढगाळ वातावरणात भिज पाऊस सुरूच असून आज सकाळी सूर्यदर्शन झालेच नाही.