
देशभरात नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता पहायला मिळतेय. अशातच तळीरामांसाठी खुशखबर आहे. कारण नाताळ आणि 31 डिसेंबरनिमित्त मद्यविक्री आणि बिअर बार उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे. मद्यविक्रीची दुकानं रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत आहे. तर पोलीस आयुक्तालये असणाऱ्या हद्दीत बिअर बार आणि इतर आस्थापनांना पहाटे 5 पर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास मंजुरी आहे. नाताळ आणि नववर्षानिमित्त 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी राज्यातील विविध मद्य विक्रीची दुकानं आणि बिअर बार निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
वेळेत शिथिलतेची मंजुरी असली तरी सार्वजनिक शांतात, कायदा आणि सुव्यवस्था यांचा विचार करून जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार वेळेची शिथिलता कमी करू शकतील. नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी पोलिसांचा जागोजागी चोख बंदोबस्त असणार आहे. ड्रंक अँड ड्राइव्हसारख्या घटना घडू नयेत यासाठी वाहतूक पोलीस सजग असतील. नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अवैध दारू विक्रीवर चाप बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथकं तैनात होतील.