आज रात्री १२ वाजल्यापासून बेस्टचा संप, मुंबईकरांचे होणार हाल, वाहतूक आणि विद्युत कर्मचारीही होणार सहभागी
मुंबई लोकल नंतर मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन मानली जाणाऱ्या बेस्टची चाके गुरुवारी रात्री १२ वाजल्यानंतर ठप्प होणार आहे. बेस्टच्या १२ कामगार संघटनांनी एकत्र येऊन विविध प्रलंबित मागण्यासाठी संपाची हाक दिली आहे.

मुंबईची दुसरी लाईफ लाईन म्हटली जाणारी बेस्ट बस सेवा आज ( गुरुवारी रात्री १२ नंतर ) रात्री ठप्प होणार आहे. बेस्ट उपक्रमातील कार्यरत १२ कामगार संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या विविध मागण्यासाठी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात बेस्ट उपक्रमातील वाहतूक आणि विद्युत पुरवठा या अतितात्काळ सेवा पुरविणा-या विभागासोबतच अन्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचारी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
बेस्ट उपक्रमातील कार्यरत १२ कामगार संघटनांनी एकत्रित येऊन ‘बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती’ च्या माध्यमातून दि. १८ जून२०२६ च्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. ‘बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती’ ने आजी माजी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांच्या सर्व मागण्यांबाबत १८ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत निर्णय घ्या अन्यथा बेमुदत संपावर जाऊ असा निर्वाणीचा इशारा या समितीने दिला आहे.या आंदोलनात बेस्ट उपक्रमातील वाहतूक आणि विद्युत पुरवठा विभागातील अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी देखील सहभागी होणार असल्याने मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
बेस्ट उपक्रमातर्फे संपूर्ण बृहन्मुंबई आणि विस्तारित उपनगरातील जनतेला ‘अव्याहतपणे परिवहन सेवा’ आणि मुंबई शहर परिसरात ‘अविरतपणे विद्युत पुरवठा’ या दोन सेवा पुरविल्या जातात. या दोन्ही सेवा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम, २०२३ अन्वये ‘अत्यावश्यक’ या सदरात मोडतात. यामुळे सर्व शाखा-विभाग प्रमुख यांना असे सूचित करण्यात येते की, दि.१८ जून२०२६ पासून हे संप-आंदोलन मागे घेईपर्यन्त कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये असे परिपत्रक बेस्ट प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने आता तातडीची पावले उचलून पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सर्व रजा रद्द केल्या आहेत.