गावात भीषण दुष्काळ असताना अजित पवार राष्ट्रवादीच्या सदस्याकडून लावणी नृत्यांगनेवर पैशांची उधळण
सध्या राज्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. अशावेळी सामाजिक भान जपणं आवश्यक आहे. पण अजित पवार राष्ट्रवादीच्या सदस्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आलाय.

राज्यभरात एकीकडे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजा हवालदिल झाला असून, पाण्याचा थेंब-थेंब मिळवण्यासाठी ग्रामीण भागात संघर्ष सुरू आहे. शासनानेही सार्वजनिक कार्यक्रमांवर आणि उधळपट्टीवर निर्बंध आणण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या सगळ्या संकटाशी जणू काही घेणेच नाही, अशा थाटात भंडारा जिल्ह्यात एका लोकप्रतिनिधींनी लावणीच्या कार्यक्रमात पैशांची उधळण केली. हा लाजिरवाणा आणि संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहना गावात रात्री ‘मंडई’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समिती सदस्य तथा मोहाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती देवा चाकोले यांनी कार्यक्रमात नाचणाऱ्या नृत्यांगनेवर पैशांची उधळण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारे पैशांची उधळपट्टी करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
गोंदियात पाण्याची नासाडी
एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती आहे तर दुसरीकडे गोंदियात पाण्याची नासाडी होतेय. गोंदिया नगर परिषद हद्दीत सर्रास पाण्याचा अपव्यय. भूमिगत गटार योजनेचं काम सुरू असल्याने रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी पाण्याचा अपव्यय. पी.सी.स्नेहल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने दररोज मारले जाते पाणी. एल निनोमुळे यंदा पावसाने ओढ दिली. त्यामुळे राज्यात गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.
सोलापूरमध्ये शेतकऱ्याचा ऊस जळून खाक
ऐन दुष्काळात सोलापूरमध्ये शेतकऱ्याचा 29 एकर ऊस जळून खाक झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ गावातील घटना. शेतकरी पिंटू जाधव यांचा उभा ऊस जळून खाक झालाय. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून यामध्ये शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी गावाकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ऊस वाचवण्यात अपयश आले. या आगीमुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात आधीच दुष्काळामुळे बळीराजा त्रस्त असताना संपूर्ण ऊस जळाल्याने शेतकऱ्याची चिंता वाढलीय.