Gold: या राज्यात दडलाय भारताचा सर्वात मोठा सोन्याचा खजिना; केंद्र सरकारचा मोठा प्लॅन
Gold: सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत देशांतर्गत सोन्याचं उत्खनन वाढवण्याची तयारी करत आहे. भारतात अंदाजे 501 ते 518 दशलक्ष टन प्राथमिक सोन्याचा साठा आहे.

Gold: भारतामध्ये सोन्याला केवळ मौल्यवान धातू म्हणून नाही, तर गुंतवणूक आणि परंपरेचा महत्त्वाचा भाग म्हणूनही पाहिलं जातं. लग्नसमारंभ असो किंवा सण-उत्सव, सोन्याची खरेदी करण्याकडे भारतीयांचा कल कायम असतो. मात्र, देशात सोन्याची मागणी मोठी असतानाही भारताला मोठ्या प्रमाणात सोनं परदेशातून आयात करावं लागतं. विशेष म्हणजे, भारतातच सोन्याचा मोठा साठा उपलब्ध आहे. बिहारमध्ये देशातील सर्वाधिक सोन्याचं संसाधन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सोन्याची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी सुरू आहे.
नेमका काय आहे सरकारचा प्लॅन?
भारताची परदेशातून सोन्याची आयात कमी करण्यासाठी नीती आयोगाकडून देशांतर्गत सोन्याचं उत्खनन वाढवण्याचा रोडमॅप तयार केला जात आहे. या नव्या धोरणाचा उद्देश देशातील सोन्याच्या उपलब्ध साठ्याचा योग्य वापर करून परदेशातून सोनं खरेदी करण्यासाठी खर्च होणारं परकीय चलन वाचवणं हा आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, प्रस्तावित योजनेमध्ये सोन्याचं उत्खनन करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याची शिफारस केली जाऊ शकते. तसंच खाणकामासाठी कंपन्यांना दीर्घकालीन अधिकार देणं आणि लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंपन्यांचं तांत्रिक कौशल्य तपासून त्यांना रेटिंग देण्याचाही विचार आहे. यामुळे या क्षेत्रात सक्षम गुंतवणूकदार आकर्षित होण्यास मदत होईल.
बिहारमध्ये सोन्याचा सर्वाधिक साठा
भारतातील सोन्याच्या साठ्याबाबत समोर आलेली आकडेवारी विशेष लक्षवेधी आहे. देशात अंदाजे 501 ते 518 दशलक्ष टन प्राथमिक गोल्ड ओर म्हणजेच सोनं असलेले खनिज उपलब्ध आहे. त्यातून अंदाजे 600 ते 607 टन शुद्ध सोनं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये बिहारचा वाटा सर्वाधिक म्हणजेच 44 ते 45 टक्के आहे. त्यानंतर राजस्थानचा 25 टक्के आणि कर्नाटकचा 21 टक्के वाटा आहे. पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी जवळपास 3 टक्के, तर झारखंडमध्ये 2 टक्के सोन्याची संसाधनं आहेत.
बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सोनो परिसर सोन्याच्या खनिजासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. मात्र, उपलब्ध संसाधने आणि प्रत्यक्ष उत्खननासाठी आर्थिकदृष्ट्या सिद्ध झालेला साठा यामध्ये फरक आहे. त्यामुळे या खनिजांचं पुढील सर्वेक्षण आणि संशोधन महत्त्वाचं ठरणार आहे.
भारतात दरवर्षी 800 टनांहून अधिक सोन्याची आयात
भारत हा जगातील सोन्याचा पाचवा सर्वात मोठा आयातदार देश आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताने 71.98 अब्ज डॉलर किमतीचे 800 टनांहून अधिक सोने आयात केले. यामध्ये स्वित्झर्लंडचा सर्वाधिक वाटा होता. भारताच्या एकूण सोन्याच्या आयातीपैकी जवळपास 34 ते 40 टक्के सोने स्वित्झर्लंडमधून आले. एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारताची सोन्याची आयात वार्षिक तुलनेत 39.9 टक्क्यांनी कमी होऊन 24.78 अब्ज डॉलरवर आली. मात्र, तरीही भारताची आयातीवरील निर्भरता कायम आहे.
उत्खननातील अडचणी दूर करण्यावर भर
भारतात सोन्याचं उत्खनन अपेक्षेप्रमाणे वाढलेलं नाही. भूगर्भशास्त्रीय माहितीचा अभाव, मर्यादित संशोधन, परवानग्यांसाठी लागणारा वेळ आणि लिलाव प्रक्रियेतील अडचणी यामुळे अनेक प्रकल्प रखडतात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय वाढवणे, परवानगी प्रक्रिया सुलभ करणं आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार माहिती उपलब्ध करून देण्यावर नव्या धोरणात भर दिला जाणार आहे.
नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांनी ‘भारताची सुवर्ण खाण धोरण : आव्हाने, अनुभव आणि पुढील दिशा’ या मसुदा अहवालावर चर्चा केली आहे. आता या प्रस्तावित धोरणाची अंमलबजावणी झाल्यास देशांतर्गत सोन्याचं उत्खनन वाढण्यास मदत होऊ शकते. परिणामी, भविष्यात भारताची परदेशातून सोन्याची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्याची शक्यता आहे.
