सायेब… तुम्हीच सांगा माणसं कुठं जाळायची..? स्मशानभूमीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात चक्क मृतदेहच आणला… भंडाऱ्यातील गावकऱ्यांचं संतप्त आंदोलन

भंडाऱ्यात स्मशानभूमीच्या जागेसाठी ग्रामस्थांनी मृतदेह घेऊन तहसील कार्यालयावर धडक दिली. दोन वर्षांपासून रखडलेली मोजणी प्रशासनाने अखेर आंदोलनानंतर पूर्ण केली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे चिचोली ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

सायेब... तुम्हीच सांगा माणसं कुठं जाळायची..? स्मशानभूमीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात चक्क मृतदेहच आणला... भंडाऱ्यातील गावकऱ्यांचं संतप्त आंदोलन
Chicholi Village Protest
| Updated on: Dec 23, 2025 | 4:35 PM

प्रशासकीय उदासीनता आणि सरकारी दिरंगाईचा फटका बसल्यानंतर सर्वसामान्य नागरिक कोणत्या टोकाची भूमिका घेऊ शकतात, याचा प्रत्यय भंडारा जिल्हयातील मोहाडी तालुक्यात आला. “सायेब… तुम्हीच सांगा आता माणसं कुठं जाळायची?” असा काळीज पिळवटून टाकणारा प्रश्न विचारत चिचोली येथील ग्रामस्थांनी चक्क एका मृत व्यक्तीचा मृतदेह घेऊन तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयाला घेराव घातला. दोन वर्षे पाठपुरावा करूनही स्मशानभूमीच्या जागेची मोजणी होत नसल्याने ग्रामस्थांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

नेमका वाद काय?

मोहाडी तालुक्यातील चिचोली गावातील जुना गट क्रमांक ३४६ ही जागा नदीकाठावर आहे. ती जागा अनेक वर्षांपासून स्मशानभूमी म्हणून वापरली जाते. शासकीय दप्तरीही या ठिकाणी अंत्यसंस्कार होत असल्याची नोंद आहे. मात्र, या स्मशानभूमीच्या लगत असलेल्या काही शेतकऱ्यांनी स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप चिचोली ग्रामपंचायतीने केला आहे. या अतिक्रमणामुळे गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

दोन वर्षांपासून केवळ ‘तारीख पे तारीख’

स्मशानभूमीची हद्द निश्चित करण्यासाठी आणि अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने गेल्या दोन वर्षांपासून महसूल विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालयाकडे सतत पाठपुरावा केला. मोजणीसाठी लागणारे शुल्क भरून आणि आवश्यक पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनं दिली जात होती. मोजणीचे आदेश असूनही अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट होती. गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागेची अडचण पुन्हा समोर आली. यावेळेस संयम सुटलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीत जाण्याऐवजी ग्रामस्थांनी तो मृतदेह ट्रॅक्टरमध्ये ठेवला. थेट मोहाडी येथील तहसील कार्यालय गाठले. भर दुपारी मृतदेह घेऊन शेकडो ग्रामस्थ कार्यालयाच्या दारात उभे ठाकल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.

पोलिस मध्यस्थी आणि प्रशासनाची धावपळ

कार्यालयासमोर मृतदेह असल्याने तणाव वाढला होता. याची माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. प्रभारी तहसीलदार विमल थोटे आणि भूमी अभिलेखचे प्रभारी उपअधीक्षक हरिदास नारनवरे यांनी तातडीने मोजणीचे पथक तयार करून गावात पाठवले.

प्रशासकीय पथकाने चिचोली येथे जाऊन पोलीस बंदोबस्तात स्मशानभूमीच्या जागेची मोजणी प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त करत जर आज आम्ही मृतदेह आणला नसता, तर ही मोजणी आणखी किती वर्ष रखडली असती? असा सवाल उपस्थित केला. मोजणी पूर्ण होऊन हद्द निश्चित झाल्यानंतरच ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आणि संबंधित मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

“चिचोली ग्रामपंचायतीकडून अतिक्रमणाबाबत अर्ज प्राप्त झाला होता. त्यानुसार आम्ही भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणीचे आदेश दिले होते. आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी पूर्ण करण्यात आली असून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला जात आहे, अशी प्रतिक्रिया मोहाडीचे प्रभारी तहसीलदार विमल थोटे यांनी दिली. तर भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रभारी उपअधीक्षक हरिदास नारनवरे यांनी तहसीलदारांच्या आदेशानुसार आम्ही आज संबंधित गट क्रमांकाची मोजणी केली आहे. कामात काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला असावा, मात्र आज मोजमाप पूर्ण झाले आहे, अशी माहिती दिली.