श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी 1 जूनला सुरू होणार का? जिल्हा प्रशासनाकडून विकासकामांची पाहणी

नाशिक इथं 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या वेळी श्री क्षेत्र भीमाशंकर इथं होणाऱ्या गर्दीचं प्रमाण लक्षात गेता जुन्या सभामंडपाचं क्षेत्र कमी पडणार असल्याने नवीन भव्य सभामंडपाचं काम हाती घेण्यात आलं आहे. याठिकाणी सुविधा उपलब्ध होण्यासाठी 288.17 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कामं हाती घेण्याती आली आहेत.

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी 1 जूनला सुरू होणार का? जिल्हा प्रशासनाकडून विकासकामांची पाहणी
Bhimashankar temple
Image Credit source: Instagram
| Updated on: May 24, 2026 | 11:55 AM

नाशिक इथं 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात विकासकामं सुरू आहेत. जून महिन्यात पावसाला सुरुवात होण्यापूर्वी ही कामं वेळेत होण्यासाठी मंदिर 31 मे 2026 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भीमाशंकर मंदिरातील विकासकामं अंतिम टप्प्यात पोहोचली असून जिल्हा प्रशासनाकडून मंदिर परिसराची पाहणी केली जात आहे. 31 मेपर्यंत बंद असलेलं मंदिर येत्या 1 जूनपासून भाविकांसाठी खुलं होणार का, याकडे शिवभक्तांचं लक्ष लागलं आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांसाठी 9 जानेवारी 2026 पासून भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. सभामंडप, घुमट, पायरी मार्ग आणि भाविक सुविधांची कामं आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. आज (रविवारी) जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग आणि मंदिर ट्रस्टकडून प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेसह भाविकांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे 31 मेपर्यंत बंद असलेलं मंदिर 1 जूनपासून सुरू करण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भीमाशंकर देवस्थानाकडून मंदिर सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुविधा पूर्ण करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान देवस्थानकडून पत्र सादर करण्यात आलं. महाद्वार ते पहिली पायरीपर्यंत संपूर्ण मार्गावर स्टील बॅरिकेटिंगची मागणी करण्यात आली आहे. तर दक्षिण बाजूस नव्याने उभारलेल्या पत्र्याच्या शेडपर्यंत सुरक्षित बॅरिकेटिंग करण्याची सूचना करण्यात आली आहे.

  • हनुमान मंदिर ते एक्झिट गेटपर्यंत भाविकांसाठी सुरक्षित मार्ग व्यवस्था करण्याची मागणी
  • ऑनलाइन पासपूर्वीचा जिना पूर्ववत करून पुढील बॅरिकेटिंग पूर्ण करण्याची अपेक्षा
  • कामांमुळे हटवलेले लाईट, CCTV कॅमेरे आणि PA सिस्टिम पुन्हा सुरू करण्याची मागणी
  • मंदिर, सभामंडप आणि परिसरातील संपूर्ण लाईटिंग पूर्ववत करण्याची सूचना
  • मंदिर परिसर स्वच्छ करून पाणी साचणार नाही यासाठी पीसीसी काम पूर्ण करण्याची मागणी
  • पायरी मार्गावरील बॅरिकेटिंगवर मजबूत पत्र्याचे आच्छादन करण्याची सूचना
  • नवीन सभामंडपातील तिन्ही दरवाजांना लॉक व्यवस्था बसवण्याची मागणी
  • भाविकांच्या सुरक्षेसाठी पूर्वीच्या सर्व सुविधा पुन्हा उपलब्ध करण्याची अपेक्षा
  • मंदिर सुरू झाल्यानंतर VIP प्रोटोकॉलवर मर्यादा आणण्याची सूचना
  • 31 मे 2026 पर्यंत सर्व कामे पूर्ण करूनच मंदिर सुरू करावे, अशी देवस्थानची भूमिका
Follow Us