शशांक हगवणेचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकरांना दणका, गृह विभागाचा मोठा निर्णय

वैष्णवी हगवणे प्रकरणात आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर देखील सातत्यानं आरोप करण्यात येत होते, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

शशांक हगवणेचे मामा आयपीएस जालिंदर सुपेकरांना दणका, गृह विभागाचा मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 29, 2025 | 5:21 PM

मोठी बातमी समोर येत आहे, आयपीएस जालिंदर सुपेकर यांना गृहविभागानं मोठा दणका दिला आहे, जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपांनंतर जालिंदर सुपेकर यांचा अतिरिक्त पदभार काढल्याची माहिती मिळत आहे. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचे मामा आहेत.

जालिंदर सुपेकर यांचं नाव वैष्णवी हगवणे प्रकरणात सातत्यानं येत होतं, आणि त्यांच्यावर आरोप देखील केले जात होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील जालिंदर सुपेकरांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आला आहे. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे, त्यांची पुणे विभागात बदली करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांच्यावर सातत्याने आरोप करण्यात येत होते, हगवणे कुटुंबातील सूनांचा छळ होत असताना हगवणे कुटुंबाला मदत केल्याचा आरोप सुपेकरांवर होत होता. या सर्व पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे, ही जरी नियमीत बदली असली तरी देखील सुपेकर यांना हे प्रकरण भोवल्याचं बोललं जात आहे.

हगवणे कुटुंबातील व्यक्तींना न्यायालयी कोठडी

हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडी संपल्यानं बुधवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं, कोर्टानं वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसांनी वाढवली, तर सासरा आणि दीर यांची पोलीस कोठडी 31 मे पर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान आज वैष्णवीच्या सासुची, नंणदेची आणि पतीची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं होतं, यावेळी कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील आरोपी वैष्णवीचा पती  शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.