
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा हादरला बसला, मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं तर दुसरीकडे मात्र महायुतीचा विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दणदणित विजय झाला आहे. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला सर्वात मोठा फटका बसला आहे. दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल हाती येताच आता शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांमध्येच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजू वैद्य यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र हे यश महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये टिकवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला, भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग झालं, दरम्यान अजूनही हे इनकमिंग सुरूच आहे. पक्षाला लागलेली गळीत थांबवण्याचं मोठं आवाहान आता शिवसेना ठाकरे गटापुढे असणार आहे. पक्षाला लागलेली गळती शिवसेना ठाकरे गटासाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहेत, त्यातच आता राजू वैद्य यांनी देखील राजीनामा दिला आहे.
दरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट मनसेसोबत युती करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बोलणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच युतीसंदर्भात घोषणा होऊ शकते, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गट देखील शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती करणार असल्याची शक्यता आहे.