Disha Salian case : दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट, आदित्य ठाकरे यांचं एफआयआरमध्ये नावाच नाही
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणात सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई प्रतिनिधी : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणात सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. दरम्यान आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून आदित्य ठाकरे किंवा कोणाचाही स्पष्टपणे उल्लेख नाही. दिशा सालियानचे वडील सतिश सालियान यांच्या फक्त जबाबात आदित्य ठाकरे आणि इतर व्यक्तींचा संशयित आरोपी म्हणून उल्लेख आहे. मात्र दुसरीकडे एफआयआरमध्ये आरोपीचा उल्लेख असलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा असा उल्लेख करण्यात आला आहे.
हायकोर्टात केलेल्या याचिकेलाच एफआयमध्ये बदलण्यात आले असून, सीबीआय या प्रकरणात तपास करणार आहे. सतिश सालियन यांनी या प्रकरणात ज्या ज्या व्यक्तींची नावे जबाबात घेतली आहेत, त्यांचा खरच रोल आहे का याचा तपास आता सीबीआयकडून केला जाणार आहे. सतिश सालियान यांनी जबाबात आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मौर्या आणि इतरांवर दिशाची बलात्कार करून हत्या केली असा आरोप केला आहे. सतिश सालियान यांनी नावे घेतलेल्या व्यक्तीच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्यावरच सीबीआय पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. ठोस पुरावे मिळाल्यावरच आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश या प्रकरणात हायकोर्टाने दिले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
दिशा सालियान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. दिशा सालियानचा मृत्यू 8 जून 2020 रोजी मुंबईच्या मालाडमधील एका 14 मजली इमारतीवरून पडून झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याची नोंद करून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मात्र दुसरीकडे दिशा सालियानचे वडील सतिश सालियान यांनी मात्र या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. दिशावर सामुहिक अत्याचार झाला आणि त्यानंतर तिची हत्या झाली असा आरोप, सतिश सालियान यांच्याकडून करण्यात आला आहे.