नवी मुंबई मनपामधील कंत्राटी कामगारांची दिवाळी गोड, वेतनात 7500 रुपयांची वाढ, बोनसचीही घोषणा
नवी मुंबई मनपा व परिवहन उपक्रमातील कंत्राटी कामगारांच्या पगारामध्ये सरसकट ७,५०० हजार रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे, तर दिवाळी सणानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना ४५,००० हजार रुपयांचे बोनस देखील देण्यात आले आहे.

नवी मुंबई मनपा व परिवहन उपक्रमातील कंत्राटी कामगारांच्या पगारामध्ये सरसकट ७,५०० हजार रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे, तर दिवाळी सणानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना ४५,००० हजार रुपयांचे बोनस देखील देण्यात आले आहे. अशा प्रकारे पगारवाढ व बोनस देणारी नवी मुंबई महानगरपालिका ही पहिली महानगर पालिका ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांचा सर्व कामगारांतर्फे ‘जाहीर सत्कार तसेच वचनपूर्ती कामगार मेळावा’ पार पडला आहे.
नवी मुंबईमध्ये श्रमिक सेना युनियनतर्फे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भव्य कामगार वचनपूर्ती मेळावा पार पडला. नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार तसेच परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ मिळाल्याबद्दल भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन वाशी येथे करण्यात आले होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत कामगारांना धनादेशांचे वाटप करण्यात आले आहे. या कामगारांची दिवाळी आता गोड होणार आहे.
दिवाळी निमित्त ठाण्यात पाणीकपात रद्द
दरम्यान दुसरीकडे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईमुळे नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी सोमवार दिनांक 02/11/2026 व 09/11/2026 रोजी घेण्यात येणारा शटडाऊन रद्द करण्याचा निर्णय महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी घेतला असून तसे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
ठाणे महानगरपालिकेची स्वत:ची पाणी पुरवठा योजना व स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲण्ड इन्फ्रा. प्रा.लि. कंपनीमार्फत प्रत्येक सोमवारी ठाणे शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु दिवाळीचा सण असल्यामुळे सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पाणीपुरवठा विभागाशी चर्चा करुन दिवाळी सणाच्या काळात शटडाऊन घेवू नये अशा सूचना दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 2.11.2026 व दि. 9.11.2026 रोजीचा शट डाऊन रद्द करण्यात आला असून, त्याऐवजी सोमवार दि.16.11.2026 पासून पुढील प्रत्येक सोमवारी शट डाऊन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी कृपया नोंद घेऊन पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
