Manoj Jarange Audio Clip : जरांगेंच्या ऑडिओ क्लीप बॉम्बने मोठी खळबळ, शिंदे गटाच्या दाव्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; नेता म्हणाला हे आरोप…
शेलार यांनी पत्रकार परिषद घेत उदय सामंत यांनी केलेला दावा तसेच मनोज जरांगे यांनी समोर आणलेली ऑडिओ क्लीपही फेटाळली आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये कोणत्याही भाजपा नेत्याचा आवाज नाही. या ऑडिओ क्लीपशी भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा संबंध नाही, असे शेलार म्हणाले.

Manoj Jarange Patil Audio Clips : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे 500 कोटी देण्यात आले आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या नेत्यांना सांगितले आहे. तशी कुजबूज भाजपात सुरू आहे, असा दावा जरांगे यांनी केला. हा दावा केल्यानंतर आता त्यांनी काही ऑडिओ क्लीप बाहेर आणल्या आहेत. या ऑडिओ क्लीपमध्ये जरांगे यांच्याबाबत चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. दरम्यान ही क्लीप बाहेर आल्यानंतर शिंदे गटाने हात वर केले आहेत. तसेच या क्लीपमधील लोक ही भाजपाची आहेत, असा मोठा दावा मंत्री तथा शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केलाय. या क्लीपची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केलीय. दरम्यान, आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या क्लीपबाबातचे सर्व दावे फेटाळले आहेत.
हे आम्हाला मान्य नाही
शेलार यांनी पत्रकार परिषद घेत उदय सामंत यांनी केलेला दावा तसेच मनोज जरांगे यांनी समोर आणलेली ऑडिओ क्लीपही फेटाळली आहे. “एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे आम्हाला मान्य नाही. समोर आलेल्या ऑडिओ क्लीपबाबत आमची असहमती आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे,” असे शेलार म्हणाले.
क्लीपच्या सत्यतेला कुठलाही आधार नाही
तसेच, ज्या ऑडिओ क्लीपची सत्यताच स्पष्ट नाही. ज्या क्लीपबाबत चौकशी झालेली नाही. ज्या ऑडिओ क्लीपच्या सत्यतेला कुठलाही आधार नाही, अशा क्लीपबाबत उदय सामंत यांचा गैरसमज झाला असेल तर आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू,” अशी भूमिकाही त्यांनी घेतली.
त्या क्लीपची चौकशी व्हायला नको का?
या ऑडिओ क्लीपमध्ये कोणत्याही भाजपा नेत्याचा आवाज नाही. या ऑडिओ क्लीपशी भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा संबंध नाही. एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. ते आमचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबाबत कोणीही शंका उपस्थित करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. मनोज जरांगे यांच्याकडे आलेली क्लीप खरी आहे की नाही याची चौकशी व्हायला नको का? मनोजज जरांगे यांनीदेखील या ऑडिओ क्लीपची चौकशी करा अशी मागणी केली आहे. तीच आमची मागणी आहे, असेही पुढे शेलार म्हणाले.
सत्य पराजित कधीच होत नाही
ऑडिओ क्लीपमध्ये जो दावा करण्यात आलाय तो 100 टक्के खोटा आहे. या क्लीपची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जरांगे यांच्याकडे जे काही असेल ते त्यांनी तपास संस्थांना द्यावेत. सत्य पराजित कधीच होत नाही. भाजपा या क्लीपशी असमहत आहे. आम्ही मित्रपक्षांचा गैरसमज दूर करू, असे शेलार यांनी पुन्हा एकदा सांगितले.