बारामतीत शरद पवार दुष्काळ पाहणीला, भाजप नेत्याने जुना हिशोबच मांडला; विचारले बोचरे सवाल, म्हणाले…
Dilip Khaire Questions Sharad Pawar: शरद पवारांच्या बारामती दौऱ्याने राजकीय वातावरण तापलं आहे. दिलीप खैरेंनी पाण्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

शरद पवार बारामतीत दुष्काळी दौरा करत आहेत. या दौऱ्यावरून भाजप नेते दिलीप खैरे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच शरद पवारांना काही प्रश्न विचारलेले आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याचा या पत्रात म्हटलं आहे. तसेच शरद पवारांच्या कारकिर्दीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. सोबतच राजकारणावर देखील भाष्य केलेला आहे. दिलीप खैरे हे बारामतीतील भाजपचे नेते आहेत.
दिलीप खैरे म्हणाले की, आदरणीय पवारसाहेब, सप्रेम नमस्कार. आपला अनेक दशकांचा राजकीय अनुभव, राज्याच्या सत्तेतील महत्त्वाची पदे, केंद्रातील जबाबदाऱ्या आणि बारामतीशी असलेले आपले प्रदीर्घ नाते हे महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. म्हणूनच आज बारामतीतील शेतकऱ्यांच्या वतीने लहान तोंडी मोठा घास घेत आहे याची जाणीव ठेवून काहीच प्रश्न विचारावेसे वाटतात.
ते म्हणाले की, पवारसाहेब, सहा दशकात बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? जर संपला असेल, तर दरवर्षी पावसाकडे आणि धरणाच्या पाण्याकडे कायम आशेने पाहणारा शेतकरी कोण? जर बारामतीचा पाण्याचा प्रश्न सुटला असेल, तर उन्हाळ्यात तलाव, बंधारे आणि शेतीसाठी पाण्याची मागणी का करावी लागते? बारामतीला विकासाचे मॉडेल म्हणताना जो काही विकास झाला त्यात आपला आशीर्वाद आहे. पण त्याचे खरे श्रेय स्व. अजितदादांचे आहे हे आपण ही मान्य कराल ही अपेक्षा ठेवू का? पण आपल्या स्वभावानुसार आपण कुणाचेच नाहीत हे वेळोवेळी आपल्या कृतीतून दाखवले आहेच.
दिलीप खैरे म्हणाले की, पण आपण अलीकडे जनता सोडाच आपल्याच कुटुंबातील नातवांमध्ये सुद्धा जे करताय ते म्हणजे आपल्या कूटनितीचा विलक्षण प्रयोग आहे. तो पाहून आम्ही सर्व थक्क आहोत. खरे तर आपल्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेऊन विकासाचे राजकारण, समाजकारण करणे अपेक्षित नाही का? आज सोमेश्वर साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या काळातच आपण आपल्या स्वभावानुसार दुष्काळी गाव भेट दौरा नेमका पुरंदर बारामतीत आखला. सोबतीला लाडक्या नातवासह सर्व उमेदवार घेऊन दौरा करत आहात. “ताकाला जाऊन भांडे लपवणे ” असा हा प्रकार नाही का? नव्वदीचे वयोमान असणारा माणूस असे वागतोय यातच आपले अपयश दडले आहे.
ते म्हणाले की, वर्षानुवर्षे मोठमोठे प्रकल्प, योजना आणि आश्वासने यांची चर्चा झाली. पण सामान्य शेतकऱ्याला आजही प्रश्न पडतो. आमच्या शेतात पाणी नेमके कधी येणार? राजकारणात एवढी वर्षे असताना अनेक प्रश्न सोडवता आले, अनेक योजना आणता आल्या; मग बारामतीच्या कायमस्वरूपी पाणीप्रश्नासाठी दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक उपाय का झाला नाही? आज बारामतीच्या दुष्काळी भागातील शेतकरी पावसाची वाट पाहतोय. तलाव भरतील का, बंधारे भरतील का, कालव्याला पाणी मिळेल का, विहिरीला पाणी राहील का?
दिलीप खैरे पुढे म्हणाले की, म्हणूनच एक शेवटचा प्रश्न विचारावासा वाटतो की, साहेब, बारामतीचा विकास इतका झाला म्हणतात; मग पाण्याचा विकास अजून बाकी का? साहेब, सोमेश्वरच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा वापर करून आपल्या लाडक्या नातवाच्या विधानसभेच्या निवडणुकीची पायाभरणी करण्यापेक्षा किंवा माळेगाव प्रमाणे मधली मते खाऊन नातवाची वाट अप्रत्यक्ष सुकर करण्यापेक्षा आता महत्व आहे ते शेतकऱ्याच्या शेतात कायमस्वरूपी पाणी पोहोचण्याचे.
बारामतीला केवळ निवडणुकीच्या वेळी नव्हे, तर कायमचे दुष्काळ मुक्त ठेवण्यासाठी कायम प्राधान्य ठेवले पाहिजे. आता पुढील प्रश्न जनतेसमोर ठेवत आहोत. अनेक वर्षे सत्ता आणि राजकारण हातात असताना बारामती कायम दुष्काळी का राहिली?, असा सवाल त्यांनी केला आहे. यावर आता शरद पवारांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
