Manoj Jarange Patil : चंद्रशेखर बावनकुळेंच्या विषयात भाजप नेत्याची मनोज जरांगे यांना कळकळीची विनंती
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील सध्या भाजपावर तुफान हल्लाबोल करत आहेत. काही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्यावरुन त्यांनी सरकारविरोधात मोठा असंतोष प्रगट केला. आता भाजप नेत्याने त्यांना एक कळकळीची विनंती केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्यावरुन सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतेच जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होते. मनोज जरांगे पाटील सातत्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे मराठ्यांना मिळणारी प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा सडकून टीका केली. भाजपं आमदार, नेते प्रसाद लाड हे सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधला सेतू मानले जातात. मध्यंतरी मे महिन्यात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्याआधी सरकारच्यावतीने प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
प्रसाद लाड पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहेत. “17 तारखेला मी स्वत: अंतरवली सराटीला जाऊन मनोज जरांगेंशी चर्चा करणार आहे. त्यांची समजूत काढणार, गैरसमज दूर करणार” असं प्रसाद लाड बोलले. “आंदोलनाचा त्यांचा जो विषय आहे त्याबाबत आधीही त्यांच्याशी बैठक झाली, १४ पैकी ११ एसओपी पुर्णत्वास आल्या आहेत. बावनकुळे यांच्याबाबत त्यांचा गैरसमज आहे, जातपडताळणी समिती हे महसूलचं काम नाही तर समाज कल्याण विभागाचे काम आहे. जातपडताळणी समितीकडून दाखल अर्ज जर बाद झाला, तर जिल्हाधिकारी स्तरावर फेरतपासणीचेही आदेश देता येतात” असं प्रसाद लाड म्हणाले.
समाजाला डाग लागणार नाही असं वागावं
“जरांगेंचा लढा हा लेकरा बाळांचा लढा आहेत. ते लढवय्ये कार्यकर्ते आहेत, चर्चेला चांगलं स्वरूप येईल ही खात्री आहे” असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. “मनोज जरांगे पाटलांच्या अर्वाच्च भाषेतील टिकेला आमचा विरोध आहे, यापूर्वीही होता. त्यामुळे आमच्यात वादही झाले. महिलांना शेतकरी बनवण्याचे काम बावनकुळे यांनी केलंय, तेली समाजाचे असूनही मराठा समाजाबाबत त्यांच्या मनात आदर आहे” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं. “वैयक्तीक व्यंग मनोज दादांनी करू नये, ही विनंती आहे. समाजाला डाग लागणार नाही असं वागावं. आंदोलकांनी आक्रमक रहावं पण आक्रमकतेमुळे आंदोलन भरकटू नये याची त्यांनी काळजी घ्यावी” असं प्रसाद लाड म्हणाले.