सोलापूरचा पालकमंत्री बदला, मोहिते पाटलांची मागणी, आता ‘मर्यादा’ सांगून राम सातपुतेंचा पलटवार; दुष्काळाच्या धगीत राजकारण पेटलं!
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दुष्काळ मोर्च्यात जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

दुष्काळावरून पंढरपुरात राष्ट्रवादीने मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये खासदार मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर मोठी टीका केली होती. यानंतर आता भाजपने थेट मोहिते पाटील यांना उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी मोहिते पाटील यांनी आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या पाणी टँकर बाबत कधी माहिती घेतली का ? ते कधी बांधावर गेले का ? असे सवाल करीत मोहिते पाटील यांना डीवचले आहे.तसेच पंढरपूरातील मोर्चा म्हणजे स्टंट आणि अस्तित्वाची लढाई होती. राष्ट्रवादीचे आमदारही या मोर्चाला नव्हते. अशीही टीका यावेळी भाजपाचे नेते चेतनसिंह केदार यांनी केली आहे.त्यामुळे सोलापुरात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध मोहिते पाटील असा राजकीय कलगीतुरा रंगला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना बदलण्याची मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली होती. दुष्काळ मोर्चादरम्यान त्यांनी पालक मंत्र्यांना बदलण्याची मागणी केली होती. या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी मोहिते पाटलांवर जोरदार पलटवार केला आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांच्या राजकीय मर्यादांवरच बोट ठेवलं, तर शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी मोर्चालाच स्टंटबाजी म्हटले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला होता. पालकमंत्री जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत, त्यांना बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मोहिते पाटील यांनी म्हटले होते. यानंतर भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक गावं अजूनही पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप करीत, पालकमंत्री बदलण्याचा निर्णय तुमच्या हातात नाही, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.