बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या – भाजपच्या मंत्र्याकडून कोणाला खुली ऑफर ?

भाजपचे कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी मविआतील आमदाराला अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. "बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या" अशा शब्दांत त्यांनी हे खुल ऑफर दिली. हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे.

बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या - भाजपच्या मंत्र्याकडून कोणाला खुली ऑफर ?
जयकुमार गोरे यांची कोणाला खुली ऑफर ?
Image Credit source: social media
| Updated on: Apr 25, 2025 | 8:24 AM

विधानसभा निवडणुकांपासून सुरू झालेले पक्षबदलांचे सत्र अद्यापही कायम असून विविध पक्षात इनकमिंग-आऊटगोईंग वेगाने सुरू आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ( शिंदे गट) यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचे चित्र गेल्या अनेक महिन्यांपासून दिसत आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या, असं म्हणत भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांनी उबाठा गटाच्या आमदाराला पक्ष बदलाचा सल्ला दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हे वक्तव्य करत उबाठाला बाभळीच्या झाडाची उपमा दिली आहे.

भाजपात येण्याची खुली ऑफर

पुण्याच्या खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 36 दुष्काळग्रस्त गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणी परिषदेची बैठक घेण्यात आली. त्यावेळी माण-खटावचे भाजप आमदार आणि कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी खेडचे उबाठा गटाचे आमदार बाबाजी काळे यांना अप्रत्यक्षरित्या पक्ष बदलाचा सल्ला दिला.

“लोक आपल्या निवडून देतात तेंव्हा त्यांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा असतात. आणि त्या पूर्ण केल्या नाही तर लोक दुसरे कोणाचा तरी शोधत राहतात, त्यामुळे लोक कधीही बाभळीच्या झाडाखाली उभी रहात नाहीत. लोक आंब्याच्या झाडाची सावली पाहतात आणि आंबे कुठे मिळतात हेच शोधतात. त्यामुळे तुम्ही आंब्याच्या झाडाकडे या आणि पाण्याचा प्रश्न सोडवा,” अशा शब्दांत गोरे यांनी शिवसेनेचे बाबाजी काळे यांना भाजपात येण्याची खुली ऑफर दिली.

उत्तर पुणे जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नाला हात घालत, गोरे यांनी 36 गावांतील ग्रामस्थांना जनतेच्या पाणीप्रश्नासाठी शासनदरबारी वकील म्हणून काम करण्याचे आश्वासन दिले. भाजपकडून उबाठा गटाच्या आमदारांना दिलेल्या या खुल्या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.आता त्यावर शिवसेनेचे बाबाजी काळे काय म्हणतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.