पुण्यातल्या आठही जागा भाजपकडेच राहतील, चंद्रकांत पाटलांचं सूतोवाच

आम्ही फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच गांभीर्याने घेतो, असा टोला चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Pune) यांनी लगावला. शिवाय जागावाटपावर बोलताना पुण्यातल्या जागांबाबत चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलंय. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांच्या (Pune BJP Melava) मेळाव्यात ते बोलत होते.

पुण्यातल्या आठही जागा भाजपकडेच राहतील, चंद्रकांत पाटलांचं सूतोवाच

पुणे : मुख्यमंत्री कुणाचा हा प्रश्न सध्या शिवसेना आणि भाजप यांच्यात चर्चेचा विषय बनलाय. शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी भाजपवर केलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Pune) यांनी उत्तर दिलंय. तानाजी सावंत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आम्ही फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच गांभीर्याने घेतो, असा टोला चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Pune) यांनी लगावला. शिवाय जागावाटपावर बोलताना पुण्यातल्या जागांबाबत चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलंय. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांच्या (Pune BJP Melava) मेळाव्यात ते बोलत होते.

सध्या मुख्यमंत्रीपदाचे दावे केले जात आहेत. मात्र मुख्यमंत्री कोणाला करायचं हे ठरलेलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या तिघांच्या बैठकीत हे आधीच ठरलं असल्याचं  चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सत्तेचा माज उतरवण्याची धमक शिवबंधनात आहे, अशी टीका तानाजी सावंत यांनी केली होती.

“पुण्यातल्या आठही जागा भाजपकडेच राहतील”

पुणे शहरातल्या आठ विधानसभेच्या जागांवरही चंद्रकांत पाटलांनी सूचक वक्तव्य केलं. ज्या जागा आपल्याकडे नसतात, त्यावर दावा करायचा असतो. पुण्यातल्या आठही जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे त्याबाबत कसला दावा करायचा, असं म्हणत पुण्यातल्या आठ विधानसभेच्या जागा भाजपकडे राहतील, असं सूतोवाच चंद्रकांत पाटलांनी केलं.

जागावाटपात काही जागांबाबत विचार केला जातो. कोअर कमिटीच्या बैठकीत ते ठरवलं जाईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळे लढण्यात धोका आहे, असं आपलं मत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकार स्थापन करायला एक कोटी 70 लाख मतदान लागतं. हे मतदान भाजप महायुतीला मिळेल आणि 220 जागा महायुती जिंकू शकेल, असं पाटील म्हणाले.

“… तर मी स्वतः निवडणूक लढण्यास तयार”

आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का यावर बोलताना, पक्षाच्या कोअर कमिटीने लढायचे आदेश दिले तर लढायला तयार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. कुठला मतदारसंघ हेही कमिटी सांगेल, असंही त्यांनी म्हटलंय. आपण जनतेतून निवडून येत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वारंवार सांगतात. मात्र शरद पवार हे एकाच मतदारसंघातून निवडून येतात. मी पाच मतदारसंघातून निवडून येतो, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

अजित पवारांना उत्तर

भाजपात येण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी अनेकदा म्हटलंय. तर चंद्रकांत पाटील अफवा पसरवत असल्याचा आरोप विरोधक करतात. या विधानाचा चंद्रकांत पाटलांनी समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना वाटलेल्या अफवा व्यवहारात आल्या. त्यामुळे ते मी काय बोलतो याकडे लक्ष ठेवून असतात, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगमुळेच काँग्रेसने एक अध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्ष केले आहेत. कारण त्यांना आपले लोक भाजपमध्ये जाण्याची भीती आहे. मात्र काँग्रेसच्या या पाच कार्याध्यक्षांपैकी एक कार्याध्यक्ष बाहेर पडला तर आश्चर्य वाटायला नको, असं सूचक वक्तव्यही चंद्रकांत पाटलांनी केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *