माजी उपनगराध्यक्षांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हे, गुन्हे दाखल होण्याचे कारण काय?

| Updated on: Oct 15, 2022 | 5:26 AM

चिखली शहरातील पुंडलिकनगर भागातील जागेच्या मूळ मालकांनी अनेकांना प्लॉट अकृषक असल्याचे सांगितले.

माजी उपनगराध्यक्षांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हे, गुन्हे दाखल होण्याचे कारण काय?
bul n
Image Credit source: tv 9
Follow us on

गणेश सोळंकी, Tv9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा : चिखली नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष (former sub-presidents) कुणाल बोंद्रे, त्यांचे वडील आणि दोन काका यांच्याविरुद्ध चिखली पोलीस (Chikhli Police) ठाण्यात दुसऱ्यांदा फसवणुकीचे (Fraud) गुन्हे दाखल करण्यात आले. या चारही आरोपींच्या नावावर असलेला चिखली येथील भूखंडाची विक्री नागरिकांना काही वर्षांपूर्वी केली होती. तरीही ती जागा बँकेला गहाण देऊन त्यावर सुमारे दोन कोटींचे कर्ज घेण्यात आले. प्लॉट खरेदी करणाऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार श्रीमती लक्ष्मीबाई शिपे यांनी चिखली पोलिसात दिली होती. विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा याचप्रकरणी या चारही आरोपीविरुद्ध प्लॉट धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील पुंडलिकनगर भागातील जागेच्या मूळ मालकांनी अनेकांना प्लॉट अकृषक असल्याचे सांगितले. जास्त पैसे घेऊन विक्री केली. सुरेश बोंद्रे या मूळ मालकांनी प्लॉट आम्हाला विक्री केलेला होता. तरीही गहाण ठेवून त्यावर दोन कोटी रुपये कर्जाची उचल केलीय.

शिवाय ज्या नागरिकांनी त्यांच्या जवळून प्लॉट विकत घेतले होते, त्यांच्या नावाने खरेदी तर झालीय. मात्र सातबारा त्यांच्या नावावर न होता, मूळ मालक असलेल्या या चार आरोपींच्या नावावर अद्यापही कायम आहे .

प्लॉट धारकांनी बोंद्रे कुटुंबाला अनेक वेळा सांगितले की, आम्ही घेतलेले प्लॉट आमच्या नावावर करून द्या. मात्र त्यांनी आतापर्यंत उडवाउडवीची उत्तरे दिलीत. शिवाय या भूखंडावरील ओपन स्पेस, क्रीडांगण, रस्तेसुद्धा विकले आहेत.

महसूल विभागही त्यांच्याकडे दिलेले आकृषक आदेश हे बनावट असल्याचे सांगत आहेत. त्याची नोंद करता येत नाहीय. त्यामुळे प्लॉट धारकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे परस्पर झालेल्या या व्यवहारामुळे फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली.

या तक्रारीवरून पोलिसांनी सुरेश आप्पा बोंद्रे, सुभाष आप्पा बोंद्रे, काशिनाथ आप्पा बोंद्रे आणि कुणाल बोंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. अशी माहिती तपास अधिकारी सचिन चौहान यांनी दिली.