Explainer : दिशा सालियान प्रकरणात CBI कडून गुन्हा दाखल, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंवर आरोप काय? वाचा A टू Z
दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्या दिवशी दिशा राहत असलेल्या फ्लॅटवर पार्टीही झाली होती. पण दिशाच्या वडिलांनी दिशाच्या मृत्यूचं कनेक्शन हे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडलंय. दिशा सालियान ही सुशांत सिंहची माजी मॅनेजर होती. दिशाचा मृत्यू 8 जून 2020 ला झाला तर 6 दिवसांनी 14 जूनला सुशांत सिंहचा मृतदेह त्याच्या घरात आढळला.

Disha Salian Death Case : दिशा सालियान हत्या प्रकरणात CBI ने आता गुन्हा दाखल केलाय. दिशाच्या वडिलांनी जबाबात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय. दिशाच्या वडिलांनी या बड्या नेत्यांची नावे घेतलेली असली तरीही CBIच्या FIR कॉपीत आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंचं नावच नाही. सीबीआयने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळेच आता दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान, या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी काय आरोप केला? सीबीआयच्या एफआयआरमध्ये नेमके काय आहे? तसेच भविष्यात या प्रकरणात काय होऊ शकते, ते जाणून घेऊ या..
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची CBIकडून चौकशी होणार?
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात ठोस पुरावे मिळाल्यावर CBI त्याप्रमाणे कारवाई करणार आहे. सामूहिक बलात्कार, हत्या आणि पुरावे नष्ट करणे अशी कलमं या प्रकरणात लावण्यात आली आहेत. जबाब नोंदवताना दिशाचे वडील सतीश सालियान यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, रोहन रॉय, अभिनेता डिनो मोरया, अभिनेता सूरज पांचोली, परमबीर सिंह, सचिन वाझे यांची नावं घेतली आहेत. आता दिशाच्या वडिलांच्या आरोपांनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची CBIकडून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
दिशा सालियान प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री रामदास कदम उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. दूध का दूध झालं पाहिजे, आदित्य ठाकरे दोषी आहेत का याचा तपास करा अशी मागणी त्यांनी केलीय. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण CBIकडे सोपवण्यात आलंय.
सतीश सालियान यांनी काय काय आरोप केले?
दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी CBIकडे जबाब नोंदवला. या जबाबात धक्कादायक दावे केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांनी या प्रकरणावर पांघरुण घालण्यात महत्वाची भूमिका बजावली. कागदपत्र, फाईल्स, इतर सार्वजनिक रेकॉर्ड नष्ट करण्यासाठी आणि गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला. दिशाच्या विरोधात गुन्हेगारी कट आणि त्यानंतर आत्महत्येची खोटी कहाणी तयार केली. त्यासाठी आदित्य ठाकरे, रोहन रॉय, डिनो मोरया, सूरज पांचोली, उद्धव ठाकरे, अनिल देशमुख, सचिन वाझे, परमबीर सिंह जबाबदार आहेत. त्यांच्या भूमिकेची चौकशी होणं आवश्यक आहे, असं सतीश सालियान आपल्या जबाबात म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे हे ड्रग्जच्या धंद्यात होते- वकिलाचा आरोप
दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्या दिवशी दिशा राहत असलेल्या फ्लॅटवर पार्टीही झाली होती. पण दिशाच्या वडिलांनी दिशाच्या मृत्यूचं कनेक्शन हे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडलंय. दिशा सालियान ही सुशांत सिंहची माजी मॅनेजर होती. दिशाचा मृत्यू 8 जून 2020 ला झाला तर 6 दिवसांनी 14 जूनला सुशांत सिंहचा मृतदेह त्याच्या घरात आढळला. मुलीच्या मृत्यूवरुन सुशांतच्या कुटुंबीयांचा आरोप आदित्य ठाकरेंवर आहे. आदित्य ठाकरे हे ड्रग्जच्या धंद्यात होते. त्याचे व्हिडीओ पुरावे दिशा सालियानने सुशांत सिंहला दिले. सुशांतने रिया चक्रवतीला हे सांगितलं. आणि त्यानंतर दोघांनाही संपवण्यात आलं, असा आरोप दिशा सालियान यांच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी केला. दरम्यान, CBI च्या दाखल गुन्ह्यात सध्यातरी कोणाचेही नाव नाही. CBIने अज्ञात असा उल्लेख केलाय. अर्थात आता CBIकडून तपास होईल आणि त्यानंतर काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.