
सध्या मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यातच आज मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन केले. यामुळे मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता भाजपच्या एका नेत्याने मोठे विधान केले आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली. नाईलाजला कोणताही इलाज नाही. पण ज्या मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत, त्यासाठी जरांगे पाटील हट्ट करत आहेत. यामुळे सामान्य जनतेला वेठीस धरू नका, अशा कठोर शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुनावले.
सांगलीतील पोलीस फॉरेन्सिक व्हॅन गाडीच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना मनोज जरांगेंच्या आंदोलनाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. ज्या मागण्या मान्यच होऊ शकत नाहीत, अशा मागण्यांसाठी जरांगे पाटील बसले आहेत. या आंदोलनादरम्यान ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने दहा लाख रुपयांची मदत दिली आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी लवकर सापडत नाहीत. त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली. यातून तब्बल ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. एक नोंद दहा दाखले देऊ शकते. या देशाचा कायदा आहे की, जातीची नोंद वडिलांकडून काढावी लागते. सरसकट मराठ्यांना कुणबी करा ही मागणी कोणत्याही कायद्यात बसत नाही. सर्वोच्च न्यायालयानेही तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशी मागणी कायद्याच्या चौकटीत बसत नाही.” असेही चंद्रकात पाटील म्हणाले.
प्रॅक्टिकल नियमांनी या. लोकशाहीत काहीही म्हणायला आणि आणायला परवानगी आहे. पण, मुंबईसारखे शहर विस्कळीत करता येणार नाही. मुंबईतील सर्वसामान्य जनतेचा काय दोष? संपूर्ण शहरात वाहतूक कोंडी झाली आहे. आम्ही तोडगे जे जे काढत आलो ते काढले. पण नाईलाजला काही इलाज नाही. जे मान्य होणार आहे ते आम्ही मान्य करू, पण जे मान्यच होणार नाही त्याचा हट्ट कशाला? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही खोटा आश्वासन दिले नाही. त्यांनी जे लिहून दिले ते सर्व आश्वासन पूर्ण झाले आहे. त्यामुळे मागण्या कधीही व्यावहारिक असाव्यात, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला