नाशिक, रायगडचा पालकमंत्री कोण? CM फडणवीसांच्या जवळच्या मंत्र्यांचं महत्त्वाचं वक्तव्य
नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे. याबाबत महायुतीचे तिन्ही नेते निर्णय घेतली, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील नाशिक, रायगडचा पालकमंत्रिचा वाद कायम आहे. मागील अनेक महिन्यांपासून दोन जिल्ह्यांचा पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा, अशी बॅनरबाजी केली आहे. या सर्व घडामोडीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. पालकमंत्रिपदाच्या तिढ्याबाबत बावनकुळे म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी योग्य आहे. पण मी आधीच स्पष्ट केलं आहे की, सर्वस्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे आहेत. मुख्यमंत्री फडणवीस योग्य निर्णय घेतील. मुख्यमंत्री फडणवीस हे सर्वच पक्षाला सोबत घेतील. त्यांचा समन्वय करून निर्णय होत असतो. पालकमंत्रिपदाबाबत सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे आणि आमचे मुख्यमंत्री निर्णय घेतील.
विदर्भातील ओबीसींच्या आंदोलनावर बावनकुळे म्हणाले, ‘ आतापर्यंत ओबीसी आरक्षणासाठी सकारात्मक निर्णय घेतले आहे. काँग्रेसच्या काळात जितके निर्णय झाले नाही, तितके निर्णय हे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतले आहेत. त्यांच्या आणखी काही माहिती असतील, तर आम्ही मान्य करू. ओबीसींना काही अतिरिक्त सवलती हव्यात. त्यांच्या काही मागणया आहेत. त्याचा सुद्धा विचार केला जाईल’.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यंनी राजकीय निवृत्तीवर भाष्य केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी म्हटलं की, ‘ पंकजाताई कुठल्या संदर्भाने म्हणाल्या हे माहीत नाही. मला असं वाटतं की, त्या अशा कधीच विचार करत नाही’. तर धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘धनंजय मुंडे कोणत्या संदर्भाने म्हणाले हे माहीत नाही. त्यामुळे मी टिपण्णी करणे योग्य नाही. खरंतर महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार जपून राजकारण केलं पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन विकासाचं राजकारण केलं पाहिजे. ही भूमिका महत्त्वाची आहे’.