UPSC Success Story : वयाच्या 22 वर्षी झाल्या आयपीएस, दुसऱ्याच प्रयत्नात यश; कोण आहेत सृष्टी मिश्रा?
हे यश मिळवण्यासाठी सृष्टी मिश्रा रोज आठ तास अभ्यास करायच्या. कुटुंबातील सदस्यांकडूनही त्यांना त्यासाठी चांगला पाठिंबा मिळाला. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 15 दिवस आराम केला.

UPSC Exam : यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण अशी परीक्षा आहे. दरवर्षी 9 ते 10 लाख विद्यार्थी परीक्षा देतात. परंतु फक्त 900 ते 1000 परीक्षार्थीच ही परीक्षा उत्तीर्ण होतात. एकदा का ही परीक्षा उत्तीर्ण झाली की आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस पदावर राहून शासकीय सेवा करता येते. विशेष म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत ही पदं अत्यंत प्रतिष्ठेची मानली जातात. त्यामुळेच या परीक्षेची लाखो विद्यार्थी तयार करत असतात. कित्येक तास अभ्यास, कित्येक वर्षांची तयारी करूनही बहुसंख्य विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करू शकत नाहीत. परंतु अशी एक आयपीएस अधिकारी आहे, जिने अवघ्या 22 व्या वर्षी या परीक्षेचं शिखर सर करून दाखवलं. दुसऱ्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवलं. या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे सृष्टी मिश्रा.
22 व्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण
सृष्टी मिश्राने अवघ्या 22 व्या वर्षी आयपीएस होण्याचा बहुमान मिळवला. 2023 साली त्या यूपीएससी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या मुळच्या उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण परदेसात झाले. त्यांचे वडील आदर्श कुमार मिश्रा हे परराष्ट्र मंत्रालयात अंडर सेक्रेटरी आहेत. दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, कांगो, कंबोडिया या देशातही शिक्षण घेतलेले आहे. म्हणूनच त्यांची इंग्रजी बोलण्याची पद्धत काहीशी परदेशी वाटते.
गुणतालिकेत मिळवला 95 वा क्रमांक
त्यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतलेली आहे. पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच त्यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला होता. आपल्या पहिल्या प्रयत्नात त्यांना यूपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करता आल्या नाहीत. परंतु दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांनी पूर्व, मुख्य परीक्षा तसेच मुलाखत हे अडथळे पार करत गुणतालिकेत 95 वा क्रमांक मिळवला.
रोज केला आठ तास अभ्यास
दरम्यान, हे यश मिळवण्यासाठी सृष्टी मिश्रा रोज आठ तास अभ्यास करायच्या. कुटुंबातील सदस्यांकडूनही त्यांना त्यासाठी चांगला पाठिंबा मिळाला. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी 15 दिवस आराम केला. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी चालू केली. वडिलांचेही मार्गदर्शन असल्याने त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. आज त्या आयपीएस अधिकारी म्हणून सेवा देत आहेत.
