
छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त विभागप्रमुख (HOD) राजाभाऊ सुबराव लोंढे यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. राजाभाऊ लोंढे हे गेल्या ४० दिवसांपासून बेपत्ता होते. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांचा शोध सुरु होता. आता याप्रकरणी एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. आर्थिक वादातून अत्यंत थंड डोक्याने कट रचून त्यांची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह जंगलात खोल खड्ड्यात पुरण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राजाभाऊ लोंढे हे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवृत्त झाले होते. गेल्या ५ फेब्रुवारी २०२६ पासून ते अचानक बेपत्ता झाले. याबद्दल त्यांच्या कुटुंबाने रितसर तक्रार नोंदवली होती. ही तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र सुरुवातीला त्यांना कोणताही सुगावा लागत नव्हता. यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. यानंतर मग पोलिसांना मुख्य आरोपी विशाल राठोड याच्यावर संशय बळावला.
यावेळी विशाल राठोड याची चौकशी केली असता तपासात चित्रपटालाही मागे टाकणारी समोर आली. मुख्य आरोपी विशाल राठोड आणि राजाभाऊ लोंढे यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद होता. लोंढे यांचा काटा काढण्यासाठी आरोपीने हत्येच्या तीन दिवस आधीच गेवराई तांडा येथील जंगलात जेसीबीने दोन मोठे खड्डे खोदून ठेवले होते. विशेष म्हणजे, हे खड्डे खोदताना संशय येऊ नये म्हणून त्याने येथे गुप्त धन शोधायचे आहे, असे सांगून जेसीबी चालकाची दिशाभूल केली होती.
यानंतर ५ फेब्रुवारीच्या रात्री आरोपींनी राजाभाऊ लोंढे यांना दौलताबाद येथील एका फार्महाऊसवर पार्टीसाठी नेले. तिथे त्यांना मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करायला लावले. त्यानंतर परतत असताना साजापूर शिवारातील रेल्वे पुलाजवळ आरोपींनी लोंढे यांच्या डोक्यात पिस्तूलने गोळी झाडत त्यांची हत्या केली. त्यानंतर मग त्यांनी आधीच ठरवलेल्या जागी नेऊन त्यांचा मृतदेह खड्ड्यात गाडून टाकला.
यानंतर मुख्य आरोपी विशालने सुरुवातीला मी शांताराम लोंढे यांना सिग्मा हॉस्पिटलजवळ सोडले होते असा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे विश्लेषण केले असता विशालचा खोटेपणा उघड झाला. यानंतर खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत विशाल विकास राठोड (२४), त्याचा मेहुणा आकाश विनोद पवार (३२) आणि मित्र करण विलास आडे (२२) या तिघांसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. रविवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई पूर्ण केली.