इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, किती जणांचा मृत्यू? किती जखमी? फडणवीसांनी दिली माहिती

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची माहिती समोर येत असून, घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, किती जणांचा मृत्यू? किती जखमी? फडणवीसांनी दिली माहिती
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2025 | 5:51 PM

पुण्यामध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे, इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळला , या घटनेत वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे, तर काही पर्यटकांचा मृत्यू देखील झाला आहे. ही घटना मावळमध्ये असलेल्या कुंड मळ्यात घडली आहे. आज रविवार असल्यानं या परिसरात पर्यटकांची संख्या देखील जास्त होती, याच दरम्यान आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा पूल कोसळला. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, काही पर्यटकांचा वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या घटनेतील मृतांना  श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नेमकं काय म्हटलं फडणवीस यांनी? 

‘पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.’ असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

 

नेमकं काय घडलं? 

पुण्यातील इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळल्याची घटना घडली आहे. मावळमध्ये असलेल्या कुंड मळ्यात ही घटना घडली आहे. या घटनेत 20 ते 25 भाविक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून, काही पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे.