
संगमनेर : प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी अपत्य प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्यावर PCPNDT कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर आज संगमनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे. समन्स न मिळाल्याने मागील महिन्यातील सुनावणीसाठी इंदोरीकर महाराज गैरहजर होते. आजच्या सुवणीसाठी ते स्वतः हजर राहून जामिनासाठी अर्ज करणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. अपत्य प्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना आता पुन्हा कोर्टात हजर रहावं लागणार आहे. 2020 साली दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली.
आज कोर्टात काय होणार?
हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला होता. तोच आदेश सुप्रीम कोर्टानेही कायम ठेवल्याने इंदोरीकर महाराजांविरोधात संगमनेर कोर्टात हा खटला नव्याने सुरू झाला आहे. मागील महिन्यात कोर्टाने समन्स बजावले. मात्र, ते समन्स इंदोरीकर महाराजांना भेटले नाही असा रिपोर्ट पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आला होता. या प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी होणार असून इंदोरीकर आज कोर्टात हजर राहाणार का ? आणि त्यांच्या जामिनाबाबत काय होते ? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.