इंडस्ट्री सोडून जाण्याच्या तयारीत होता अभिनेता; ‘धुरंधर’ने रातोरात पालटलं नशीब
'धुरंधर' या चित्रपटातील एक अभिनेता इंडस्ट्री सोडण्याच्या तयारीत होता. आदित्य धरच्या या प्रोजेक्टमुळे आणि चित्रपटातील एका भूमिकेमुळे आयुष्य कसं पालटलं, याविषयी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या 22 दिवसांनंतरही ‘धुरंधर’ची जोरदार कमाई सुरू आहे. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाला मागे टाकत ‘धुरंधर’ 2025 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन यांची तर चर्चा होतच आहे, परंतु असाही एक कलाकार आहे जो ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या आधी इंडस्ट्री सोडण्याचा विचार करत होता. परंतु या चित्रपटामुळे त्याला एक नवी आशा मिळाली आहे. ‘धुरंधर’मध्ये ‘डोंगा’ची भूमिका साकारणारा अभिनेता नवीन कौशिकने याबद्दल सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे.
नवीन कौशिकची पोस्ट-
‘प्रिय आदित्य सर, एक अभिनेता असणं म्हणजे हे पूर्णपणे विश्वासावर आधारित आहे. आधी तुम्ही योग्य मार्ग निवडलात यावर तुमच्या कुटुंबाचा विश्वास मिळवणं. मग एक प्रोफेशनल म्हणून तुमच्या इंडस्ट्रीचा तुमच्यावर विश्वास मिळवणं. त्यानंतर एका दिग्दर्शकाला त्याच्या दृष्टिकोनासाठी तुमच्यावर विश्वास ठेवायला लावणं आणि शेवटी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांचा विश्वास जिंकणं. या सगळ्यात तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट विसरता ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. त्यासोबतच हे मानणं की सर्व त्याग, सर्व नकार, परत न येणाऱ्या कास्टिंग कॉल्सची अंतहीन प्रतीक्षा, पेमेंटसाठी पाठलाग करणं, नेटवर्किंग, प्रतिभा नसलेल्या स्टार्ससमोर तुमच्या क्षमतेवर शंका घेणं.. या सगळ्याचा काहीतरी अर्थ आहे. या सगळ्याचा अर्थ हाच आहे की तुम्ही इथे असायलाच हवं होतं. तुम्ही इथे असण्यासाठी पात्र आहात. हाच स्वतःवरील विश्वास मी पूर्णपणे गमावला होता. मी हार मानून ही इंडस्ट्री सोडण्यास इथून निघून जाण्याच्या तयारीत होतो. परंतु तेव्हा मुकेश सरांच्या सांगण्यावरून मी तुमची भेट घेतली. इंडस्ट्री कायमची सोडण्यापूर्वी ही माझी शेवटची एक आशा होती’, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, ‘आपली भेट म्हणजे दिल्लीतील रंगभूमीच्या मुळांशी जोडलेल्या दोन समवयस्क मुलांची भेट होती. आपण या शहरात कसे आणि का आलो, हे आठवण्याबद्दलची ती भेट होती. तो दिवस मला आजही आठवतोय, जेव्हा चित्रपटातील कलाकारांना तू एकत्र जमवलंस आणि कथा सांगितल्यानंतर आम्हा सर्वांना म्हणालास, तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवा आणि हा भव्य प्रकल्प साकार करण्यासाठी मला मदत करा. तेव्हा मला अचानक जाणवलं की हा माझा चित्रपट आहे. मी त्यात अभिनय करत होतो म्हणून नाही तर मी जणू काही त्या गावाचा एक भाग झालो होतो जे एका मुलाचं संगोपन करतं.’
‘हा दीड वर्षाचा प्रवास अविस्मरणीय होता. कठीण, कधी कधी निराशाजनक पण अत्यंत रोमांचक. लोकेशन्सपासून ॲक्शनपर्यंत या संपूर्ण प्रवासात आदित्य सर तुम्हीच त्या जहाजाचे कॅप्टन होता. ज्याने ते जहाज स्थिर ठेवलं. जेव्हा कधी आम्ही डगमगलो तेव्हा तुम्ही आम्हाला आधार दिला. कधी कधी आम्ही भरकटलोही असतो पण तुम्ही आम्हाला योग्य मार्ग दाखवलात. चित्रपटातील एका पात्राला पडद्यावर साकारण्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात आणि माझ्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक बनवण्यास मदत केली. तुम्ही मला पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
‘आता तुम्ही या देशातील दिग्दर्शकांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचत असताना, मला माहित आहे की जग आता तुम्हाला एक मास्टर, एक प्रतिभावान, एक कुशल कारागीर आणि एक कथाकार म्हणून ओळखत आहे, जे तुम्ही खऱ्या अर्थाने आहात,’ असं नवीनने या पोस्टच्या अखेरीस म्हटलंय.
