
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता लवकरच महाराष्ट्रातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आगामी निवडणुकांबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार रविंद्र चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत महायुतीने महापालिका निवडणुका एकत्र लढण्याचा अंतिम निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्थानिक स्तरावरील मतभेद दूर करण्यासाठी युती धर्माचे पालन करावे, यावरही भर देण्यात आला.
सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक बैठक पार पडली. साधारण दीड तास बंद दाराआड ही बैठक सुरु होती. या बैठकीत राज्यातील महापालिका निवडणुकांबद्दल अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच महापालिका निवडणुकांच्या रणनितीबद्दलही चर्चा करण्यात आली.
या बैठकीत मुंबई, ठाणे यांसारख्या मोठ्या महापालिकांसह संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या (ZP) निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा होऊन एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महापालिकानिहाय आणि झेडपीनिहाय जागावाटपासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत चर्चा सुरु होईल, असेही बोललं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका वेळेवर घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात निवडणुका पार पडू शकतात असे बोललं जात आहे. तसेच काही अपवादात्मक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दिले आहेत. मात्र, समन्वय समितीच्या बैठकांमध्ये कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच युतीतील नेत्यांनी युती धर्माचं पालन करा आणि कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको. संघर्ष होईल अशी आपली वर्तणूक नको, असा स्पष्ट सल्ला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
भाजप आणि शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या पक्षांमध्ये प्रवेश देऊ नये किंवा फोडू नये, यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. कार्यकर्त्यांना सांभाळण्याची आणि त्यांच्या कामांची दखल घेण्याची सूचना करण्यात आली. अलीकडील नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीच्या घटकपक्षांमध्ये झालेले काही वाद किंवा कटुता आता संपली आहे. झालं गेलं विसरून पुन्हा नव्या दमाने कामाला लागायचं आहे, असा स्पष्ट संदेशही या बैठकीतून देण्यात आला.