Devendra Fadnavis : मला सांगा, मग TMC चे 15 आमदार कसे निवडणूक आले? SIR वर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सवाल

Devendra Fadnavis : "मूळात तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, 2000 सालापासून याद्या ठीक झालेल्या नाहीत. 2004 साली एकदा SIR केलं. दर पाचवर्षांनी SIR केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात SIR चा प्रश्न इतका नाही"

Devendra Fadnavis : मला सांगा, मग TMC चे 15 आमदार कसे निवडणूक आले? SIR वर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सवाल
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 27, 2026 | 1:08 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. SIR मतदार नोंदणी प्रक्रियेवरुन जे आरोप केले जातायत, ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची जी मागणी केली जातेय, संवैधानिक संस्थांवर जे प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय या सर्व मुद्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं. SIR मुळे तुमच्या मतदारसंघात मतं कमी झाली आहेत म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ असं नरेटिव पसरवलं जातय, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचाराला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो पश्चिम बंगालमध्ये ज्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात एसआयआरमुळे मतं कमी झाली, अशा 15 मतदारसंघात टीएमसीचे उमेदवार निवडून आले. मतदार भाजपचे होते, बाकी काढून टाकलेले मग SIR मुळे मतदार कमी झालेल्या मतदारसंघात टीएमसीचे 15 उमेदवार कसे निवडून आले?”

“मूळात तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, 2000 सालापासून याद्या ठीक झालेल्या नाहीत. 2004 साली एकदा SIR केलं. दर पाचवर्षांनी SIR केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात SIR चा प्रश्न इतका नाही. पण शहरांमध्ये जास्त आहे. कारण इथे स्थलांतर मोठ्या प्रमाणात आहे. इतर राजकीय पक्षांना सुद्धा संधी आहे. मला वाटतं या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याऐवजी आपलं आत्मपरीक्षण करणं गरेजचं आहे” असं मुख्यमंत्री म्हणाले.

संविधानाने दिलेली लोकशाही मान्य नाही

“मी पहिल्यादिवसापासून सांगतोय राहुल गांधी यांचं डिझाइन वेगळं आहे. संवैधानिक पुस्तक हातात घेऊन संवैधानिक संस्थांवर रोज आरोप लावायचे. संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह लावायचं. त्याच्यावरचा विश्वास उडवायचा. अशा पद्धतीची कारवाई आहे. त्यांना संविधानाने दिलेली लोकशाही मान्य नाही. संवैधानिक संस्था मान्य नाहीत. राहुल गांधींना हळहूळू सर्व संवैधानिक संस्था बदमान करुन भारतीय संविधानावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचय. राहुल गांधींची मानसिकता साम्यवादी, अतिडावी झाली आहे” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

SIR प्रक्रिया एकमताने झाली आहे

“त्यांना भारतात अतिडावी राजवट आणायची आहे. हळूहळू संविधानावरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न करताना दिसतायत. कालच्या पत्रकार परिषदेत एकावर्तमानपत्राने छापलेली बातमी कपोलकल्पित आहे हे स्पष्ट झालं. त्या बातमीच्या आधारे आंदोलन उभं करायचं होतं, ते किती तकलादू आहे हे समोर आलय” असं मुख्यमंत्री म्हणाले. “तिन्ही निवडणूक आयुक्तांनी सांगितलं, SIR प्रक्रिया एकमताने झाली आहे. मतभिन्नता नाहीय. ज्या फॉर्मेटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म नंबर 6 वैध ठरवलाय, त्या फॉर्मेटमध्ये 6 नंबर फॉर्म असताना त्या बाबत संभ्रम निर्माण करणं हे सर्वोच्च न्यायालयाविरोधात संभ्रम निर्माण करण्यासारखं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us