Cold wave | उत्तर महाराष्ट्रात थंडीचा अक्षरशः कहर; धुळ्याला कापरे, नंदुरबारला हुडहुडी, रस्त्यावर शुकशुकाट…!
उत्तर महाराष्ट्रातमध्ये यंदा थंडीचा अक्षरशः कहर सुरूय. घराबाहेर पाऊल ठेवायचे म्हटले, तरी चक्क अंगावर काटा येतो. न भूतो, न भविष्यती अशा गारठ्यामुळे नागरिक काकडून गेलेत. धुळ्याचे तापमान चक्क 2.8 पर्यंत खाली येतेय.

नाशिकः उत्तर महाराष्ट्रातमध्ये यंदा थंडीचा अक्षरशः कहर (Cold wave )सुरूय. घराबाहेर पाऊल ठेवायचे म्हटले, तरी चक्क अंगावर काटा येतो. न भूतो, न भविष्यती अशा गारठ्यामुळे नागरिक काकडून गेलेत. धुळ्याचे तापमान चक्क 2.8 पर्यंत खाली येतेय. तर नंदुबारच्या डोंगराळ भागातही तापमान 4 अंशापर्यंत खाली येत आहे. तर नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या निफाडमध्येही तापमान साडेचार अंशापर्यंत खाली घसरत आहे. त्यामुळे दिवसभर हुडहुडी भरते. सकाळी चक्क दहा वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य रहात आहेत. दरम्यान, या थंडीमुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. केळी, पपई आणि द्राक्षांना याचा मोठा फटका बसणार आहे. खरे तर गेल्या रविवारपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान घसरले आहे. पुढील दोन दिवस ही लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. किमान तापमान हे दहा अंशाच्या खाली आणि कमाल तापमान 28 अंशांच्या सरासरीपेक्षा 4 ते 6 अंश सेल्सिअसने कमी नोंदवल्यास त्याला थंडीची लाट म्हणतात. सध्या उत्तर महाराष्ट्रात अशी थंडीची लाट आल्याचे दिसत आहे.
धुळ्याला कापरे
धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी असून, तिचा जनजीवनावर परिणाम होत असल्याने चित्र पाहण्यास मिळत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी म्हणून नागरिकांनी रस्त्यारस्त्यावर शेकोट्या पेटवलेल्या आहेत. ग्रामीण भागात या थंडीचा शेतीवर गंभीर परिणाम होत आहे. भाजीपाला, कडधान्याचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केळी, पपई, द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. अजून काही दिवस थंडीचा कहर असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान केले जात आहे.
नंदुरबारला हुडहुडी
नंदुरबारलाही हुडहुडी भरली आहे. जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी थंडीचा कहर सुरू आहे. डोंगराळ भागातील तापमान हे 4अंश सेल्सिअसपर्यंत खाली येत आहे. सपाटी भागातही तापमान 8 अंश सेल्सिअस आहे. या कडाक्याच्या थंडीचा जनजीवनावर भयंकर परिणाम होत आहे. फळबाग आणि इतर पिकांचे नुकसान होईल म्हणून शेतकरी धास्तावला आहे. आधी अतिवृष्टी आणि आता थंडीच्या तडाख्याने खरिपासोबत रब्बी पिकावरही नांगर फिरू नये म्हणजे झाले, अशी भावना व्यक्त होत आहे.
द्राक्षाला धोका, कांद्यावर परिणाम
कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष मण्यांची फुगवण थांबली असून, ते तडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. गहू, हरभरा, भाजीपाला, कांदा, द्राक्ष यांच्यावर या हवामानाचा गंभीर परिणाम होताना दिसून येत आहे. शेतकरी पिकांवर वेगवेगळी औषध फवारत आहेत. त्यामुळे एकीकडे खर्च वाढलाय. तर दुसरीकडे धुक्यामुळे बुरशी, तांबेरा, करपा, भुरी, टिक्का, मावा, तुडतुडे या रोगाची भीती वाढली आहे. सध्या कांद्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. या हवामानामुळे लाखो रुपये खर्चून लावलेले कांदा पीक आणि द्राक्ष धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा पुन्हा एकदा ठोका चुकला आहे. ही थंडी लवकरात लवकर कधी कमी होणार, याकडेच त्याचे डोळे लागलेयत.
इतर बातम्याः
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना