हुरहुर लावणारा पिंपळपार पुन्हा बहरणार; दिवाळी पाडव्याला नाशिकमध्ये पंडित हरीश तिवारींची मैफल!

| Updated on: Oct 31, 2021 | 5:08 PM

गेल्या 21 वर्षांपासून सुरू असणारी नाशिकमधील पिंपळपारावची पाडवा मैफल कोरोनाने खंडित झाली. त्यामुळे रसिकांना वर्षभर हुरहुर लागली होती. आता तीच मैफल यंदा पुन्हा बहरणार असून यंदा पंडित हरीश तिवारी कानसेनांची तृप्ती करणार आहेत.

हुरहुर लावणारा पिंपळपार पुन्हा बहरणार; दिवाळी पाडव्याला नाशिकमध्ये पंडित हरीश तिवारींची मैफल!
पंडित हरीश तिवारी.
Follow us on

नाशिकः गेल्या 21 वर्षांपासून सुरू असणारी नाशिकमधील पिंपळपारावरची पाडवा मैफल कोरोनाने खंडित झाली. त्यामुळे रसिकांना वर्षभर हुरहुर लागली होती. आता तीच मैफल यंदा पुन्हा बहरणार असून यंदा पंडित हरीश तिवारी कानसेनांची तृप्ती करणार आहेत.

नाशिक, दिवाळी आणि पिंपळपाराच्या मैफलीचे एक अतूट नाते आहे. इथे आजवर अनेक मान्यवरांनी हजेरी लावून नाशिककरांपुढे आपली कला सादर केली. या मैफलीने दिवाळीचा पाडवा मंतरलेल्या स्वरांनी न्हाऊन निघतो आणि सणाचा आनंद द्विगुणीत होतो. मात्र, कोरोनाने सारे जग ठप्प केले. त्यात नाशिककरांना या पाडवा मैफलीलाही मुकावे लागले. यंदा मात्र कोरोनाचे रुग्ण झपाट्याने घटले आहेत. हे पाहता राज्य सरकारने सारे नियम शिथिल केले. त्यामुळे नाशिकमध्येही पिंपळपारावरची मैफल पुन्हा एकदा बहरणार आहे. या वर्षीच्या कार्यक्रमाला गानभास्कर म्हणून विख्यात असणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांचे पटशिष्य आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित हरीश तिवारी हजेरी लावणार आहेत. पहाटे पाच वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. त्यांना संवादिनीवर सुभाष दसककर, तबल्यावर नितीन वारे, पखवाजवर दिगंबर सोनवणे आणि ताल वाद्यावर अमित भालेराव साथसंगत करणार आहेत. संस्कृती नाशिक संस्थेचे अध्यक्ष आणि नगरसेवक शाहू खैरे यांनी या मैफलीचे आयोजन केले आहे.

उत्सव नर्तन सोहळ्याचे आयोजन

दिवाळी पाडवा पहाटेनिमित्त उत्सव नर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील नवरचना विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी साडेपाच वाजता ही मैफल रंगेल. यात कथक नृत्य गुरू रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी आणि विद्या देशपांडे यांच्या विद्यार्थिनी भारतातील विविध उत्सवातील नृत्य सादर करणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नियमांचे पालन करावे

एकीकडे संपूर्ण देशात शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असताना, दुसरीकडे नाशिक विभागाने विभागाने राज्यात विक्रमी आघाडी घेत तब्बल 1 कोटी 29 लाख 34 हजार 893 नागरिकांचे लसीकरण केले आहे. नाशिक विभागाला पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यामुळे हे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे या पाडवा पहाटेच्या मैफली यंदा आयोजित करणे शक्य होत आहे. मात्र, तरीही रसिकांनी कोरोना नियमांचे पालन करत या मैफलीला हजेरी लावावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

इतर बातम्याः

730 कामगारांना कामावर कधी घेणार; BOSCH कंपनीला कामगार उपायुक्तांचा सवाल

भाजप सरकारने इंधनाचे दर कमी करावेत; नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

एकाच दिवशी तब्बल 24 लाखांचे वीजबिल भरून जळगावचे 13 शेतकरी कृषिपंप थकबाकीतून मुक्त