पुण्यात राजकारण पेटलं! अमित शाहांच्या सभेआधी मोठा राडा; काँग्रेस-वंचित उतरली रस्त्यावर
अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेस-वंचितने आंदोलनाचा नारा दिला आहे.

पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमित शहा यांच्या सभेआधीच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा नारा दिला. अमित शाह यांच्या विरोधात पोस्टर झळकवत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरीत केला जाणार आहे. परंतु या कार्यक्रमाआधी राजकारण तापलं आहे. पुण्यात अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जवरून आंदोलक अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
पुण्यात काँग्रेसचा अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध
केंद्रीय अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत काँग्रेसने आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री काही युवक काँग्रेस पदाधिकार्यांना ताब्यात घेतलं होतं. या सर्व पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये नेलं. या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे दिसत आहे. पोलिसांनी रात्री कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यानंतरही आज शनिवारी काँग्रेस कार्यकर्ते पुण्यातील मार्केट यार्ड चौकात मोठ्या संख्येने जमले. यावेळी आंदोलकांनी काळे फुगे देखील आणले होते. पोस्टर आणि घोषणाबाजी करत आंदोलकांनी अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध केल्याचे दिसून आलं. परंतु पुरस्कार सोहळाच्या आयोजित कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागू नये, यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर जाऊन विरोधकांच्या आंदोलनाचा निषेध नोंदवला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.