
धुळे : मनोज माळी हे शिक्षण घेत असताना देशसेवा करण्याचे मनात ठाणले होते. दहावीनंतर त्यांनी सैन्य भरती मारली. चार वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले. तेव्हापासून देशसेवा करणे सुरू होते. तीन दिवसांपूर्वी ते दरीत पडले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वाघाडी गावात शोककळा पसरली. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत सिक्कीम येथे असताना मनोज माळी यांना वीरमरण आले. या जवानावर साश्रू नयनांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या वाघाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी धुळे जिल्हा पोलीस तसेच भारतीय सैन्य दलाच्या वतीने बंदुकीच्या 21 फैरी हवेत झाडून मनोज माळी यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय शहीद जवान मनोज यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होता. सिक्कीम येथे एका ओपी पोस्टवर कार्यरत असताना अन्य जवानांसोबत मार्गस्थ होत असताना मनोज हे दरीत पडले. यात त्यांना वीरमरण आले.
चार वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात भरती झालेले जवान मनोज माळी यांना वयाच्या 25 व्या वर्षी वीरमरण आलं. जवान मनोज यांचे पार्थिव वाघाडी गावात आल्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. वाघाडी गावांमध्ये प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून मनोज यांना आदरांजली वाहण्यात आली.
मनोज यांच्या अंत्ययात्रेपुढे यावेळी भव्य तिरंगा ध्वज घेत तरुणांनी अमर रहेच्या घोषणा देत रॅली काढली होती. गावात मनोज याच्या पार्थिवावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम, जवान मनोज माळी अमर रहे .. या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आजी-माजी सैनिक, प्रशासकीय अधिकारी, विविध लोकप्रतिनिधी यांनी मनोज यांना आदरांजली वाहिली.