जुनी गॅस लाईन बंद होणार म्हणून फोन आला, व्यापाऱ्याने नकार दिला, पण… मध्यरात्री मोबाईलवर मेसेजेस आले अन् झोपच उडाली!

डोंबिवलीत महानगर गॅस कनेक्शन अपडेट करण्याच्या नावाखाली कपडा व्यापाऱ्याची १४.४६ लाखांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी लिंक आणि बनावट फोन कॉलद्वारे नागरिकांना लक्ष्य केले असून पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जुनी गॅस लाईन बंद होणार म्हणून फोन आला, व्यापाऱ्याने नकार दिला, पण... मध्यरात्री मोबाईलवर मेसेजेस आले अन् झोपच उडाली!
cyber crime AI
| Updated on: Mar 16, 2026 | 8:51 AM

डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता एका कपडे व्यापाऱ्याला गॅस लाईन अपडेटच्या नावाखाली तब्बल १४ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महानगर गॅसचे कनेक्शन बंद होईल, अशी भीती दाखवून त्याला लुटण्यात आले. अवघ्या काही तासात व्यापाऱ्याच्या खात्यातून 8 व्यवहारांद्वारे ही रक्कम लंपास करण्यात आली.

नेमकी घटना काय?

डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर परिसरात राहणारे अरुण भगवान मोरे हे कपड्यांच्या व्यापारासह पेंटिंग आणि चायनीज खाद्यपदार्थांचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्यांना दिनेश जोशी नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण महानगर गॅस (MGL) कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवले. तुमच्या परिसरात नवीन गॅस लाईन टाकण्याचे काम सुरू होणार आहे. जुने कनेक्शन तांत्रिक कारणास्तव बंद होईल, ते सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला १२ रुपये ऑनलाईन भरावे लागतील, असे सुरुवातीला चोरट्यांनी सांगितले.

सुरुवातीला मोरे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगत कोणतीही बँक माहिती दिली नाही आणि त्या व्यक्तीला पुन्हा फोन न करण्याची तंबी दिली. मात्र, सायबर चोरट्यांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या खात्यावर डल्ला मारला. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून पैसे कपात झाल्याचे मेसेजेस येऊ लागले. मोरे यांनी कोणताही व्यवहार केला नसतानाही त्यांच्या खात्यातून एकूण १४ लाख ४६ हजार ९८९ रुपये लंपास झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांना धक्का बसला.

डोंबिवलीत फसवणुकीची ‘हॅट्ट्रिक’

गेल्या ४८ तासांत डोंबिवलीत ही तिसरी मोठी फसवणूक झाली आहे. याआधी सुनीलनगर परिसरातील दोन महिलांना अशाच प्रकारे लुटण्यात आले होते. यातील पहिल्या घटनेत एका ४५ वर्षीय महिलेला १० रुपयांचे ई-चलन भरण्याची बनावट लिंक पाठवून २.९९ लाख रुपये काढले. तर दुसऱ्या घटनेत एका ५६ वर्षीय महिलेला APK लिंक पाठवून बँक माहिती चोरली आणि १ लाख रुपयांचा गंडा घातला होता.

दरम्यान याप्रकरणी व्यापारी अरुण मोरे यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अमेरिका-इराण तणावामुळे गॅस टंचाई निर्माण होईल, अशा चर्चांचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

गॅस कंपनी कधीही फोनवरून किंवा लिंक पाठवून पैसे भरण्यास सांगत नाही.

१०-१२ रुपयांचे छोटे व्यवहार करण्याच्या बहाण्याने तुमचे खाते रिकामे केले जाऊ शकते.

संशयास्पद ‘APK’ फाईल्स किंवा ‘ई-चलन’ लिंक्सवर क्लिक करू नका.

फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

Follow Us