
आजपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. बाळासाहेबांचा आज जन्म दिवस आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईत शिवसेनेचा महापौर बसणार नाही, याचं मला प्रचंड दु:ख आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. ते म्हणाले की, जे कोणी म्हणतात आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत. ज्यांची बाळासाहेबांवर श्रद्ध आहे, त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबई महापौरपदासाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा द्यावा. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांना माझे सांगणे आहे की, बाळासाहेब यांचा आज जन्मदिन आहे. एकनाथ शिंदे त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यांनी अनुभूती दिली आहे. विधानसभेत पाहिलं आहे. उलट त्यांनीच धनुष्यबाण असलेल्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा” असं उत्तर दादा भुसे यांनी दिलं.
“भाजपासोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांना विनंती करतो की, तुम्ही भाजपला सांगितलं पाहिजे की, केंद्रात आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. तुमच्यासोबत राहू. महाराष्ट्रात तुमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे, तुमच्या बरोबर राहू. पण हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. म्हणून आपल्या मुंबईवर हा शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे” असं भास्कर जाधव म्हणाले.
आजचा अतिशय शुभ दिवस
“आजचा अतिशय शुभ दिवस आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्ताने डोळ्यांचे पारणे फेडणारा एअर शो संपन्न झाला. सर्व पायलट्सचे स्वागत करतो. चित्तथरारक शो झाला” असं दादा भुसे म्हणाले.
बदलापूर घटनेवर काय म्हणाले?
बदलापूरमध्ये पुन्हा एकदा एका चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यावर बोलताना दादा भुसे म्हणाले की, “काल दुर्देवी घटना झाली. नराधमाला ताब्यात घेतले आहे. निषेधार्ह घटना आहे. शासन पातळीवर विनंती करतो आहे की, कायद्याच्या माध्यमातून फास्टट्रॅक वर केस चालवली पाहिजे” “ऑलरेडी याबाबत स्कुलबस बाबत नियम आहे. शिक्षण विभागाला सूचना दिली आहे. शाळेबाबत गंभीर बाबी आहेत, कारवाई केली जाईल” असं दादा भुसे म्हणाले.