डिझेल टंचाई “आपत्ती” म्हणून जाहीर करा, शरद पवार गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; पत्रात काय म्हटलं?
ऐन शेती हंगामात निर्माण झालेली डिझेल टंचाई ही “आपत्ती” म्हणून जाहीर करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यामधील तणावाचा मोठा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. देशात दिवसेंदिवस इंधनाचे दर हे वाढताना दिसत आहेत. ऐन शेती हंगामात निर्माण झालेली डिझेल टंचाई ही “आपत्ती” म्हणून जाहीर करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहित ही मागणी केली आहे. या पत्रात खडसे यांनी उपाययोजनाही सुचवल्या आहेत.
रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत की,पावसाळा तोंडावर असल्याने शेतकरी बांधव पेरणीच्या तयारीला लागले आहेत. पेरणीसाठी ट्रॅक्टर, पंप, मशागतीचे यंत्र आणि इतर अवजारांसाठी डिझेल हे महत्त्वाचे आहे. पण सध्या डिझेलची दरवाढ, डिझेलच्या साठ्याबाबतचा संभ्रम, यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण होत आहे.
पावसाळा तोंडावर असल्याने शेतकरी बांधव पेरणीच्या तयारीला लागले आहेत. पेरणीसाठी ट्रॅक्टर, पंप, मशागतीचे यंत्र आणि इतर अवजारांसाठी डिझेल हे महत्त्वाचे आहे. पण सध्या डिझेलची दरवाढ, डिझेलच्या साठ्याबाबतचा संभ्रम, यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण होत आहे.
या गंभीर विषयावर मा.… pic.twitter.com/Ce15EIuCiy
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 26, 2026
रोहिणी खडसे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या
१) ऐन शेती हंगामात निर्माण झालेली डिझेल टंचाई ही “आपत्ती” म्हणून जाहीर करण्यात यावी.
२) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयांतर्गत “शेतकरी डिझेल मदत कक्ष” तातडीने स्थापन करण्यात यावा ज्याने करून शेतकऱ्यांना प्रशासनाशी संवाद साधता येईल.
३) डिझेल टंचाई पूर्णपणे निवारण होईपर्यंत हा मदत कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात यावा.
४) तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवरील डिझेल साठ्याची माहिती दर तासाला सोशल मीडियाद्वारे व मदत कक्षामार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी.
५) प्रत्येक पेट्रोल पंपावरील किमान ३० टक्के डिझेल साठा शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात यावा.
६) डिझेल भरण्यासाठी ट्रॅक्टर किंवा वाहन प्रत्यक्ष पंपावर आणण्याची सक्ती करू नये. शेतकऱ्यांनी आणलेल्या सुरक्षित कॅन, ड्रम किंवा बॅरलमध्ये डिझेल देण्यास परवानगी द्यावी.
देशातील इंधनाचे आजचे भाव
देशात पुन्हा एकदा CNG च्या दरात वाढ करण्यात आली आहे. आजपासून CNG प्रति किलो ₹2 ने महागला आहे. गेल्या 15 दिवसांत चौथ्यांदा CNG दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांनाही मोठा फटका बसत आहे. यापूर्वी 23 मे रोजीही CNG च्या दरात वाढ करण्यात आली होती. सततच्या दरवाढीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.