
Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. असे असताना राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीदेखील ईश्वरी भिसे या महिलेचा मृत्यू झालेला नसून तिची हत्या झाली आहे, असे म्हणत या प्रकरणातील डॉक्टरांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणावर बोलताना राज्य सरकारवरही टीका केली आहे.
ईश्वरी भिसे या महिलेच्या प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अगोदर 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. याच महिलेला नंतर अन्य रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र प्रसूतीनंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणा बोलताना “ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झालेला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. डॉ. घैसास यांनीर राजीनामा दिला म्हणजे काय झालं? आम्हाला राजीनामा नकोय. आम्हाला सरकारकडून तातडीने कारवाई हवी आहे. या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आलेला आहे. या अहवालातून रुग्णालय प्रशासनाची चूक आहे, हे दिसत आहे. त्यामुळेच या प्रकरणात समावेश असलेल्या सर्वावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का? असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
“मृत महिलेने ज्या मुलींना जन्म दिलाय, त्या मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. त्या मुलींवर आयसीयूमध्ये उपचार चालू आहे. त्या महिलेचे कुटुंब वेगळ्या दु:खातून जात आहे. त्यामुळे सरकारने संवेदनशीलता दाखवावी. त्या मुलीची जी हत्या झाली, तसा दिवस महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर येऊ नये त्यासाठी मी इथे आली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही तसेच इतर गोष्टी पारदर्शकपणे संपूर्ण महाराष्ट्राला समजल्या पाहिजेत. त्या दिशवी नेमकं काय झालं, ते समोर आलं पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, या प्रकरणात समाविष्ट असलेले डॉक्टर, तसेच महिलेच्या हत्येत जे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समविष्ट आहेत, त्या सर्वांनाच शिक्षा झाली पाहिजे. विशेष म्हणजे ही कारवाई एका निश्चित काळात झाली पाहिजे, असंही सुळे यांनी म्हटलंय.