अशोक खरात सोबत 39 नेत्यांचे फोटो पण संजय राऊत…, केसरकरांचं मोठं विधान

त्या मंदिरात मी आता कधीही जाणार नाही , ईशान्येश्वर मंदिराच्या विश्वस्तांची देखील चौकशी व्हायला पाहिजे.  भोंदू खरातच्या दुषकृत्याबाबत मला माहीत नव्हतं, मी धार्मिक असल्याने त्या मंदिरात गेलो, असंही यावेळी केसरकर यांनी म्हटलं आहे.

अशोक खरात सोबत 39 नेत्यांचे फोटो पण संजय राऊत..., केसरकरांचं मोठं विधान
Deepak Kesarkar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 26, 2026 | 9:45 PM

सध्या राज्यभरात अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. नाशिकच्या या भोंदू विरोधात एका महिलेनं तक्रार दाखल केली, या तक्रारीनंतर अशोक खरात याचे एक -एक कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अशोक खरात याला न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्याची एसआयटी चौकशी देखील सुरू आहे. आतापर्यंत अनेक धक्कादायक प्रकरणं समोर आले आहेत. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांचा देखील अशोक खरातसोबतचा एक फोटो समोर आला होता. त्यामुळे विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली, यावर आता दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला आले होते, त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले केसरकर? 

‘त्या मंदिरात मी आता कधीही जाणार नाही , ईशान्येश्वर मंदिराच्या विश्वस्तांची देखील चौकशी व्हायला पाहिजे.  भोंदू खरातच्या दुषकृत्याबाबत मला माहीत नव्हतं, मी धार्मिक असल्याने त्या मंदिरात गेलो. अशोक खरात याने मंदिराच्या आडून जे कृत्य केलं ते निंदनीय आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मी आणि एकनाथ शिंदे या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. एकनाथ शिंदे यांनाही या भोंदूची कल्पना नव्हती.  खरातने ज्योतिषशास्त्र बदनाम केलं आहे,’ असं यावेळी केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र रचलं जातं आहे. संजय राऊत काहीही बोलत आहेत. त्यांना देखील परिवार आहे. संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत, मधील काही काळ मी शिवसेनेचा प्रवक्ता होतो, त्यामुळे कदाचित ते माझ्यावर सूड उगवत असतील, त्यामुळे ते अशी विधानं करत आहेत. भोंदू खरातमुळे अनेक राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन होत आहे  39 नेत्यांचे खरातसोबत फोटो आहेत, पण संजय राऊत फक्त मलाच टार्गेट करत आहेत.  ईशान्येश्वर मंदिरात मी आता कधीही जाणार नाही , तेथील विश्वस्तांची एसआयटीकडून चौकशी व्हावी, भोंदू खरातला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, आणि पिडीतांना न्याय मिळायला हवा, असं यावेळी केसरकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us