
सांगली जिल्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शौर्य प्रदीप पाटील (१६) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकत होतो. सेंट कोलंबस शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याची सुसाईट नोटही समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य प्रदीप पाटील याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसायाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून नवी दिल्लीतील राजीव नगर भागात स्थायिक आहेत. शौर्य हा दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. ते मूळचे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी होते. मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी शौर्यने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली रस्त्यावर उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेनंतर दिल्लीतील राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांना शौर्य पाटीलच्या स्कूल बॅगमध्ये एक दीड पानाची सुसाइड नोट सापडली आहे. या नोटमध्ये त्याने शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून हे कृत्य करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. “मेरा नाम शौर्य पाटील हैं… आय अॅम व्हेरी सॉरी. आय डीड धीस. पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया. सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं. स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू.” असे त्याने सुसाईट नोटमध्ये नमूद केले आहे.
या सुसाइड नोटच्या आधारावर राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल यांच्यासह मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या चार शिक्षिकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शौर्यचे वडील प्रदीप पाटील कामानिमित्त ढवळेश्वर येथे आलेले असताना त्यांना ही दुर्दैवी बातमी मिळाली. त्यानंतर ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. आज २० नोव्हेंबर २०२५ रोजी शौर्य पाटील याच्यावर त्याच्या मूळगावी ढवळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर आणि पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.