कुठे रात्रभर दर्शन तर कुठे 7 तासांची रांग, पंढरीच्या विठुरायापासून शिर्डीच्या साईंच्या दरबारी भक्तांचा महासागर

पंढरीच्या विठूरायापासून ते शिर्डीच्या साई मंदिरापर्यंत, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी भाविकांनी तीर्थक्षेत्रांमध्ये मोठी गर्दी केली आहे. एकादशी आणि ३१ डिसेंबरचा योग जुळून आल्याने मंदिरांमध्ये भक्तीचा उत्साह असून दर्शनासाठी लांब रांगा लागल्या आहेत.

कुठे रात्रभर दर्शन तर कुठे 7 तासांची रांग, पंढरीच्या विठुरायापासून शिर्डीच्या साईंच्या दरबारी भक्तांचा महासागर
Pandharpur Shirdi
| Updated on: Dec 31, 2025 | 1:29 PM

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. असे असतानाच आज सर्वच तीर्थक्षेत्र परिसरात भक्तीचा मोठा पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा ३१ डिसेंबर आणि एकादशी एकाच दिवशी आल्याने पंढरपुरात विठ्ठल भक्तांसोबतच पर्यटकांचीही मोठी गर्दी झाली आहे. विठू माऊलीच्या चरणी डोके टेकवून नवीन वर्षाचा संकल्प करण्यासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

पंढरपूर गजबजले

पंढरपुरातील विठ्ठल मंदिर परिसर हा सध्या पर्यटकांनी दुमदुमल्याचे पाहायला मिळत आहे. आज पहाटेपासूनच विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चंद्रभागेच्या पात्रात पवित्र स्नान करून भाविक नामघोषात पंढरीत प्रवेश करत आहेत. एकादशीचे व्रत आणि नवीन वर्षाची पूर्वसंध्या असा दुहेरी मुहूर्त साधत वारकरी संप्रदायाने पंढरपूर गजबजून गेले आहे. दर्शनासाठी ७ ते ८ तासांचा कालावधी लागत असूनही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. तसेच राज्यातील इतर तीर्थक्षेत्रातही अशीच स्थिती आहे.

साई मंदिर रात्रभर मंदिर खुले राहणार

शिर्डीत श्री साईबाबांच्या नगरीतही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली आहे. साई संस्थानने आज ३१ डिसेंबरची रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भाविकांना सुवर्ण खिडकीतून मुखदर्शन घेण्याचा सुखद अनुभव मिळत आहे. भाविकांचा वाढता ओघ पाहता १ जानेवारीची काकड आरती आणि ३१ डिसेंबरची शेजारती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अखंड दर्शन सुरू राहणार आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातही पर्यटकांचा ओघ वाढल्याने ४ जानेवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांना दर्शनासाठी ३ ते ४ तास प्रतीक्षा करावी लागत आहे. तर कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह जोतिबा डोंगर आणि पन्हाळगडावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. येथील सर्व हॉटेल्स आणि धर्मशाळा हाऊसफुल्ल झाल्या आहेत. तसेच बुलढाण्यात विदर्भातील पळशी सुपो येथील संत सुपो महाराज यांच्या पौष यात्रेलाही सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने येथेही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

भाविकांनी संयम राखून दर्शन घ्यावे

दरम्यान प्रशासन आणि सुरक्षा सज्ज गर्दीचे नियोजन करण्यासाठी पंढरपूर, शिर्डी आणि कोल्हापूरमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि सुरक्षा यावर देवस्थान ट्रस्ट विशेष लक्ष देऊन आहेत. भाविकांनी संयम राखून दर्शन घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.