‘गुंगी गुडिया’ ते बीडचं जातीपातीचं राजकारण; काँग्रेसचा इतिहास काढत धनंजय मुंडेंनी सगळं सांगितलं
Dhananjay munde : धनंजय मुंडे यांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हणणाऱ्या काँग्रेसवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. धनंजय मुंडे यांनी थेट काँग्रेसला इंदिरा गांधींची आठवण करून दिली आहे. बीडमधील जिल्हा नियोजनाच्या बैठकीनंतर प्रश्न-उत्तराची पत्रकार परिषद नव्हती, तर केवळ निवेदन देण्यासाठी माध्यमांना बोलावल्याचे सांगितले. परंतु काहींना बीडमधील वातावरण निवळू द्यायचं नाही. परंतु येणाऱ्या काळात सुनेत्रा पवार कणखर काम करून दाखवतील, असं प्रत्युत्तर मुंडेंनी गुंगी गुडिया म्हणणाऱ्या काँग्रेसला दिलं.
धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे म्हणाले, ‘काँग्रेसच्या अधिकृत पेजवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या, याचा द्वेष आहे. तसेच किती घृणा आहे. काँग्रेसने त्यांचा इतिहास पाहिला असता, खरंतर इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी कणखर काम केलं. त्याच्यापेक्षाही कणखर काम येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करून दाखवतील. काँग्रेसच्या पेजवरून हाच द्वेष पाहायला मिळाला’.
‘खरंतर तो बीडचा दौरा सुनेत्रा पवार हा पालकमंत्री म्हणून होता. सलग दोन दिवस बैठका होत्या. या बैठकीनंतर पत्रकार परिषद न घेता निवेदन देण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावलं होतं. सुनेत्रा पवार या निवेदन करत असताना दादांच्या संदर्भात विषय आल्याने सुनेत्रा वहिणी भावनिक झाल्या. त्यावेळी त्यांचा हुंदका बाहेर येत होता. त्याचवेळी माध्यमांचे प्रतिनिधी प्रश्न विचारत होते. मी त्यांना सांगत होतो की, ही पत्रकार परिषद नसून केवळ निवेदन देत आहोत, असे सांगितले होते. त्यामुळे मी स्वत: सांगितलं. त्या पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून आल्या, असे त्यांनी सांगितले.
‘सामान्य माणसांप्रती असलेलं प्रेमासाठी सुनेत्रा पवार बीडमध्ये आल्या होत्या. त्यामुळे भावनिक होऊन थांबायला हवं होतं. काहींना बीड जिल्ह्यांचे वातावरण निवळू द्यायचं नाही. जातीपातीचं राजकारण चालू ठेवायचं आहे. त्यासाठी टिचभर प्रयत्न कमी पडू देत नाही. माझ्या चमत्काराचा विषय झाला. तो विषय माझ्या तब्येतीविषयी होता. माझ्या राजकारणाचा नाही. शेतकऱ्याचा विषय झाला. तो शेतकरी जोराने बोलत होता. त्यावेळी मी शांतपणे बोलायला सांगितलं. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. ऐवढचं मी सांगितलं, असे धनंजय मुंडे यांनी पुढे सांगितले.