The Dhule Story | तिला कुणीतरी वाचवा, तिचा उपोषणाचा आज 14 वा दिवस

गीतांजली कोळी यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे.  उपोषणाचे एकामागे एक दिवस वाढत जात आहेत. गीतांजली कोळी यांची प्रकृतीची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गीतांजली ताईला वाचवा, अशी हाक अनेक सामाजिक संस्थांकडून देण्यात येत आहे.

The Dhule Story | तिला कुणीतरी वाचवा, तिचा उपोषणाचा आज 14 वा दिवस
| Updated on: May 08, 2023 | 9:51 AM

धुळे : सरकारने, प्रशासनाने आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि नेतेमंडळींकडून उपोषणाचं हत्यार उपसलं जातं. एखाद्या बड्या नेत्याने किंवा सामाजिक कार्यकर्त्याने उपोषण सुरु केलं तर राज्य आणि देशभरात त्या नेत्याच्या उपोषणाची दखल घेतली जाते. पण तळागळ्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं तर प्रशासन सुरुवातीला पद्धतशीरपणे डोळेझाक करतं हे धु्ळ्यातील एका घटनेमुळे समोर आलं आहे. धुळ्यात सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांचं गेल्या 13 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. पण प्रशासनाकडून हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही, असा आरोप करण्यात येतोय.

विशेष म्हणजे सामाजिक प्रश्नासाठी उपोषण करणं ही सोपी गोष्ट नाही. आपल्या मागण्या स्वीकारल्या गेल्या नाहीत आणि उपोषण मागे घेतलं नाही तर जीवाला धोका होऊ शकतो. आपण एकदिवस जेवण केल्याशिवाय राहू शकत नाहीत. पण धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी या गेल्या 13 दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत. तरीही प्रशासनाला पाझर फुटत नसल्याची चर्चा आहे.

धुळे शहरात जेल रोडवर वीरांगणा झलकारीबाई कोळी स्त्री शक्ती सामाजिक संस्थेच्या गितांजली कोळी आणि हिराभाऊ काकडे आमरण उपोषणाला बसले आहेत. आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळ्यांना आदिवासी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी गीतांजली कोळी आणि हिराभाऊ काकडे आमरण उपोषणाला बसले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 13 दिवसांपासून हे उपोषण सुरु आहे.

या दरम्यानच्या काळात प्रशासनाने गीतांजली कोळी यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय. पण त्यांच्या मागण्यांवर ब्र बोलायला देखील प्रशासन तयार नाहीय. त्यामुळे गीतांजली कोळी यांनीदेखील उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. या दरम्यानच्या काळात गीतांजली कोळी यांची प्रकृती ढासळली होती. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पण तरीही प्रशासन या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी किंवा सकारात्मक प्रतिसाद देण्यास पुढे सरसावत नसल्याची माहिती समोर आली आहे.

गितांजली कोळी यांच्या उपोषणाची दखल तशी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. प्रशासनाकडून गीतांजली कोळी यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, अपहर तहसीलदार विनोद पाटील यांनी गीतांजली कोळी आणि हिराभाऊ काकडे यांची उपोषणस्थळी जावून भेट घेतली आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण गीतांजली यांनी ती विनंती फेटाळून लावली आहे.

जात प्रमाणपण आणि त्याची वैधता मिळवण्यासाठीच्या मुद्द्यावर योग्य तोडगा निघणार नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. विशेष म्हणजे आदिवासी कोळी समाजातर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात आला तेव्हा संबंधित प्रातांधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र मोर्चाला अडीच महिने झाले तरी कोणतीही बैठक घेण्यात आली नाही, अशी माहिती मिळत आहे.

गीतांजली कोळी यांची नेमकी भूमिका काय?

“संपूर्ण धुळे जिल्ह्यात शेकडो वर्षांपासून आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळी राहतात. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. पण तरीही गेल्या 50 वर्षापासून आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळ्यांना आदिवासी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. हे दाखले मिळत नसल्याने आमच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं उच्च शिक्षण घेण्यासाठी सवलती मिळत नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आमचा आदिवासी कोळी बांधव शिक्षणापासून वंचित आहे. त्याच कारणामुळे तो नोकऱ्यांपासून, शासणीय सवलतींपासून वंचित आहे”, असं गीतांजली कोळी यांनी सांगितलं.

“आमच्या विद्यार्थ्यांना सुलभपणे जातीचे प्रमाणपत्र आणि त्याचे वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी हे आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या 13 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु असताना आमची प्रकृतीदेखील खालावली आहे. आमच्या जीविताची शाश्वती राहिलेली नाही. पण निगरगठ्ठ प्रशासन, धुळे जिल्हा-प्रांताधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरण आणि दिरंगाईमुळे उपोषणाचे दिवस वाढत आहेत. आमच्या कोणत्याही मागण्या मान्य होत नाहीय”, असंदेखील गीतांजली कोळी यांनी सांगितलं.

“आमची मागणी एकच आहे, इंग्रजांनी 1950 आधी ज्या कोळी नोंदी केल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे आम्हाला सरसकट अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळावे, अशी आमची मागणी आहे. अनेक गोरगरिब लोकांकडे 1950 पूर्वीच्या पोटजातीचे पुरावे नाहीत. या जातीचा उल्लेख इंग्रजांनी करायला लावलेला आहे. असं असताना जिल्हा प्रशासन आणि प्रांताधिकारी 1950 पूर्वी टोकरे कोळींचा पुरावा असल्याचा हवाला देवून आमच्या मुलांना दाखले देत नाही”, असं गीतांजली कोळी म्हणाल्या.

‘गीतांजली ताईला वाचवा’, खान्देशातील सामाजिक संस्थांची हाक

गीतांजली कोळी यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. पण तरीही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय. प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला जाताना दिसत नाहीय. त्यामुळे खान्देशातील इतर सामाजिक संस्था देखील आता आक्रमक होऊ लागल्या आहेत. काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत मार्ग करण्यासाठी विनंती देखील केलीय. पण तरीही जिल्हाधिकाऱ्यांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आहे. दुसरीकडे उपोषणाचा एकामागे एक दिवस वाढत जात आहेत. गीतांजली कोळी यांची प्रकृतीची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गीतांजली ताईला वाचवा, अशी हाक अनेक सामाजिक संस्थांकडून देण्यात येत आहे.